पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती हे राजकीय वैरी असले तरी उत्तर प्रदेशच्या राजकारणात मंगळवारी एका ऐतिहासिक घटनेची नोंद होणार आहे. संत रविदास यांच्या स्मारकाचे मोदी भूमिपूजन करणार असून या स्मारकाचा प्रस्ताव मायावती मुख्यमंत्रीपदी असताना सादर आला होता. मात्र, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन केल्याने स्मारकाचे काम रखडले होते.

संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी मंगळवारी रविदास मंदिरात जाणार आहेत. यानंतर मोदी संत रविदास जन्मस्थळ परिसर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. या प्रकल्पात रविदास यांचे स्मारक, उद्यान आणि भाविकांच्या भोजनासाठी सभागृह याचा समावेश आहे.

१९९७ मध्ये बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. या स्मारकाचा प्रस्ताव त्यांच्या काळात सादर करण्यात आला होता. खुद्द मायावती यांनी देखील हा प्रस्ताव मार्गी लागावा यासाठी प्रयत्न केले. मात्र समाजवादी पक्षाच्या विरोधामुळे हा प्रस्ताव मार्गी लागू शकला नाही.

राज्याच्या पर्यटन विभागाने सुमारे ४६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात करत आहोत, अशी माहिती वाराणसी येथील जिल्हाधिकारी सुरेंद्र सिंह यांनी दिली. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. विशेष म्हणजे २२ वर्षांपूर्वी समाजवादी पक्षाच्या विरोधामुळे हा प्रस्ताव रखडला होता, आता त्याच पक्षाशी मायावतींनी आघाडी केली आहे. त्यामुळे मायावतींना साद घालण्याचा तर हा प्रयत्न आहे का, यावर स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.