पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मिळाला आहे. हा संदेश मल्याळम भाषेत असल्याचे समजतेय.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ जून रोजी केरळमधील गुरूवायूर मंदिराला भेट दिली होती. त्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजेच ७ जून रोजी हा धमकीचा संदेश मिळाला. मालदीव दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान या मंदिरात भेटीसाठी गेले होते. धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी मिळाल्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने याला गंभीरतेने घेत याची सर्व माहिती सुरक्षा संस्थेला दिली आहे. सुरक्षा संस्थेनं त्यानंतर मोदी यांच्या सुरक्षेची तपासणी केली.

यापूर्वी दोन जून रोजी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे दिली होती. राजस्थानमधील भाजपा अध्यक्ष मदन लाल सैनी यांना एक पत्र लिहून अज्ञात व्यक्तीनं मोदींना मारण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण त्यावेळी तात्काळ पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तीन-चार संशयीत आरोपीची चौकशी केली होती.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. २०१८ मध्ये दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्याकडे मोदींना मारण्याच्या धमकीचा मेल पाठवला होता.