इराकमधील मोसुलमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. ३९ भारतीय मारले गेले असल्याची बातमी समोर आली ही अत्यंत दुःखद घटना आहे. या भारतीयांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या सगळ्यांचा शोध घेण्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि जनरल वी. के. सिंह यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. मात्र दुर्दैवी बातमी समोर आली आहे. देशाबाहेर जे भारतीय राहतात त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ज्या लोकांनी आपले कुटुंबीय गमावले त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी त्या सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ट्विटरवर त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

आयसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आज केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. राज्यसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. चार वर्षांपुर्वी मोसुलमधून या भारतीयांचं अपहरण झालं होतं. या भारतीयांमध्ये मजुरांची संख्या जास्त होती. यामधील अनेकजण पंजाबमधील होते. आयसिसने २०१४ मध्ये मोसुलचा ताबा घेतल्यानंतर या सर्व भारतीयांचं अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. भारतीय मोसुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच आयसीसने त्यांचं अपहरण केलं होतं.

‘जनरल व्ही के सिंग इराकला जाणार आहेत आणि सर्व भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणतील. इराकहून मृतदेह घेऊन उड्डाण करणारं विमान सर्वात आधी अमृतसरला, त्यानंतर पाटणा आणि नंतर कोलकाताला जाईल’.सुरुवातीला इराकमधून अपहरण झालेले भारतीय जिवंत असल्याचा दावा सरकारने केला होता. सुषमा स्वराज यांनी अपहृत भारतीयांच्या नातेवाईकांची भेटही घेतली होती. शोध घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. मात्र आता या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.