संपूर्ण देशावर करोना संकट असताना आज विघ्नहर्ता गणरायाचं आगमन होत आहे. करोना संकटाच्या काळात सण-उत्सवांवर निर्बंध आले असल्याने यावेळी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. प्रशासनाकडूनही नियमांचं पालन करत शिस्तबद्दपणे गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उत्सवाचं स्वरुप बदललं असलं तरी नागरिकांच्या मनातील उत्साह मात्र तितकाच आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया ! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट असो”.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!,”

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली
गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती गणपतीची मूर्ती दोन फुटांची ठेवावी असं आवाहनमुंबई पोलिसांनी केलं आहे. तसंच विसर्जनाच्या दिवशी आरती आणि पूजा विसर्जनस्थळी न करता घरीच करण्यात यावी असंही सांगण्यात आलं आहे.

मुंबईत १८२० मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी
मुंबईमधील तब्बल १८२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली असून काही तांत्रित बाबींची पूर्तता करण्यात अपय़शी ठरलेल्या २५६ मंडळांना मंडप परवानगी नाकारण्यात आली आहे. तर २७४ मंडळांचे अर्ज परवानगी प्रक्रियेत आहेत. मुंबईत २४७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात. आतापर्यंत मंडप परवानगीसाठी २३५० मंडळांनी पालिकेकडे अर्ज केले होते.