भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मनमोहनसिंग यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, असे मोदी यांनी ट्विटमधील संदेशात म्हटले आहे. याशिवाय, मोदींनी मनमोहनसिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधूनही त्यांना शुभेच्छा दिल्या. मनमोहनसिंग हे २००४ ते २०१४ या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात भारताचे पंतप्रधान होते. याशिवाय, त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदही भुषविले होते. त्यांच्याच काळात भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली झाली. जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि मितभाषी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे अनेक निर्णय घेतले होते. त्यांचा जन्म फाळणीपूर्वी पाकिस्तानमधील गाह येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय भारतात स्थायिक झाले.  दरम्यान, सध्या सोशल मिडीयावरून मनमोहनसिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर सध्या #HappyBdayDrManmohanSingh हा हॅश टॅग ट्रेंडिंगमध्ये आहे.