अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर ट्विटरवर लोकप्रिय असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांचा वापर त्यांची सार्वजनिक प्रतिमा तयार करण्यासाठी परिणामकारकतेने केला. त्यांनी तंत्रज्ञानात स्वारस्य दाखवून कौशल्याने या माध्यमांची हाताळणी केल्यानेच हे शक्य झाले असे एका संशाधनात नमूद करण्यात आले आहे.
मोदी यांनी सोशल मीडियाचा वापर व्यक्तिगत संदेशांसाठी केला, असे पंतप्रधानांच्या सोशल मीडिया संकेतस्थळांचे संशोधन करणाऱ्या ज्योयोजित पाल यांनी म्हटले आहे. मिशिगन स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन या संस्थेतील सहायक प्राध्यापक असलेले पाल यांनी म्हटले आहे की, मोदी यांनी तंत्रज्ञानात रस दाखवून सोशल मीडियाचा वापर करून व्यक्तिगत प्रतिमा तयार केली, देशातील तरुण पिढीच्या आशाआकांक्षांशी एकरूप होण्यात त्यांना सोशल मीडियाचा फायदा झाला. मोदी यांचे ट्विटरवर १२.३ दशलक्ष अनुसारक (फॉलोअर्स) असून, त्यांचा ओबामा यांच्यानंतर ट्विटरस्पिअरमध्ये दुसरा क्रमांक आहे.
पाल यांनी सांगितले की, प्रचाराच्या वेळी मोदींच्या खात्यावर राजकीय दृष्टिकोनातून मते दिली जात होती. राष्ट्रीय कार्यक्रम, उत्सव यांचा उल्लेख असे. वलयांकित व्यक्तींना पाठिंबा देण्याचे आवाहन केलेले असे. निवडणुकीच्या आधी त्यांनी चित्रपट अभिनेते, क्रिकेटपटू, आध्यात्मिक गुरू यांच्यातील त्यांच्या अनुसारकांची यादीच दिली होती व त्यांनी युवकांना आकर्षित करावे असे म्हटले होते. पाल यांच्या मते मोदी यांनी तंत्रज्ञानातील अद्ययावतता लगेच अंगिकारली. त्यांनी ट्विटरमधील व्हिडिओ सुविधेचा वापर केला. पंतप्रधान पदाच्या काळात त्यांच्या ट्विट्समध्ये बदल झाले. त्यांनी राजकीय विधाने कमी केली, शुभेच्छा, शोकसंदेश, ते सध्या कुठे आहेत याचे अपडेट देण्यास सुरुवात केली.
मोदी हे महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षा व्यक्तिगत संदेशांसाठी ट्विटरचा वापर करतात हे स्पष्ट झाले आहे. ही बाब ओबामा यांच्यापेक्षा वेगळी आहे.ओबामा त्यांच्या ट्विटरवरून कार्यक्रमाधिष्ठित ट्विट करतात. मोदी यांची भारतातील इतर राजकारण्यांच्या लोकप्रियतेशी तुलना करता खासदार शशी थरूर त्यांच्या आसपास असून त्यांचे ३० लाख अनुसारक आहेत. थरूर यांचे ट्विटस हे वेगळे आहेत. ते व्यक्तिगत असून त्यांचा रोजचा कार्यक्रम व विविध प्रश्नांवरील मते असे त्याचे स्वरूप आहे. वलयांकित म्हणजे सेलेब्रिटीज व्यक्ती वापरतात त्या पद्धतीने ती ट्विटरचा वापर करतात. मोदीं यांचा ट्विटर वापर हा धोरणात्मक असून, तंत्रज्ञान अधिक दृश्यपणे वापरणे हा त्यामागचा हेतू आहे. मोदी यांच्या फेसबुक पेजला २८ दशलक्ष लाइक्स आहेत व चाय पे चर्चा कार्यक्रमाचे ऑनलाईन व्हिडिओ टाकण्यात आल्या आहेत.

सोशल मीडियावर मोदी
* टरवर १२.३ दशलक्ष अनुसारक (फॉलोअर्स)
* फेसबुक पेजला २८ दशलक्ष लाइक्स
* व्यक्तिगत प्रतिमा निमितीसाठी वापर
* कार्यकर्ता ते मायबाप शैली
* व्हिडिओ सुविधेचा वापर
* तंत्रज्ञानाचा समाजापर्यंत पोचण्यासाठी वापर