जगातील टॉप १०० विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. म्हणून आम्ही पुढील पाच वर्षात देशातील २० विद्यापीठांना १० हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. २० पैकी १० विद्यापीठ हे सरकारी तर १० विद्यापीठ हे खासगी असतील, कामगिरीच्या आधारे विद्यापीठांना हा निधी दिला जाईल. पुढील पाच वर्षात या २० विद्यापीठांना जागतिक दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

पाटणा विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारी पाटण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एकाच मंचावर आले. नितीशकुमार यांनी पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणी केली. यावर मोदींनी नवी घोषणाच केली. ‘मी पाटणा विद्यापीठाला आणखी एक पाऊल पुढे नेऊ इच्छितो. जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. आता आम्ही देशातील २० विद्यापीठांसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. कामगिरीच्या आधारे विद्यापीठांना हा निधी दिला जाईल आणि मूल्यांकनासाठी त्रयस्थ संस्था नेमली जाईल असे त्यांनी सांगितले.

आधीच्या पंतप्रधानांनी माझ्यासाठी अनेक चांगली कामं सोडून दिली आहेत. असेच एक चांगले काम करण्याची संधी मला आज मिळाली. पाटणा विद्यापीठाने देशाला दिग्गज मंडळी दिली आहेत. प्रत्येक राज्यांमधील प्रशासकीय सेवेतील किमान एक अधिकारी पाटणा विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

बिहारवर ‘सरस्वती’ची कृपा आहे, आणि आता केंद्र सरकारकडून ‘लक्ष्मी’ची कृपाही होऊ शकते. बिहारला केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल. बिहारला २०२२ पर्यंत समृद्ध राज्य करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. बिहारच्या विकासात नितीशकुमार यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगत मोदींनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

तरुण पिढीने नवीन संकल्पनांवर भर देण्याची गरज आहे, तरुणाईने शिकण्यावर भर दिला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात भारतात संथगतीने विकास झाला. मात्र भारतात प्रतिभेची कमतरता नाही, देशातील आयआयएम आता जगभरातील कंपन्यांना सीईओ देत आहेत असे त्यांनी सांगितले.