पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप दौऱ्याला सोमवारपासून सुरुवात झाली. सोमवारी संध्याकाळी मोदी जर्मनीत दाखल झाले असून या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध सुधारतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर सोमवारी रवाना झाले. या देशांशी असलेले आर्थिक संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा दौरा आहे. संध्याकाळी मोदी जर्मनीत दाखल झाले असून जर्मनीतील विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. जर्मनीत मोदी चान्सलर अ‍ॅन्जेला मर्केल यांच्याशी चर्चा करणार आहेत. जर्मनीचे अध्यक्ष फ्रॅन्कवॉल्टर स्टेइनमेइर यांचीही ते भेट घेतील. मर्केल यांच्याशी ते व्यापार, सुरक्षा आणि दहशतवाद प्रतिबंध, विज्ञान-तंत्रज्ञान, कौशल्य विकास, शहरी पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा करु असे मोदींनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले.

भारतात गुंतवणूक करणाऱ्या देशांच्या यादीत जर्मनी सातव्या स्थानी आहे. जर्मनीतील १,८०० कंपन्या भारतात कार्यरत आहेत. मंगळवारी मोदींचे औपचारिकपणे स्वागत केले जाईल. यानंतर मोदी आणि मर्केल यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

मंगळवारी जर्मनीवरुन मोदी स्पेनला रवाना होणार आहेत. तीन दशकांत स्पेनला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ते राजे फिलीप चौथे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

स्पेनमधून मोदी रशियाला रवाना होणार आहेत. तेथे मोदी १८ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला हजर राहणार आहेत. मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादमिर पुतिन यांचे सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावर भाषण होणार असून भारत हा अतिथी देश आहे.
दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यांत मोदी फ्रान्सला भेट देणार आहेत. फ्रान्सचे नवे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची ते भेट घेणार आहेत.