भारत आणि इस्रायलमध्ये १९९३ मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र त्याआधीपासूनच या दोन देशांमध्ये सौहार्दाचे संबंध होते. त्यामुळेच की काय भारतातील ज्यू समाजासाठी इस्रायलने १९५० मध्येच मुंबईत दूतावासाची स्थापना केली. या दूतावासाचा मोठा फायदा भारताला झाला. यातील सर्वाधिक फायदा झाला तो महाराष्ट्राला. त्यामुळेच महाराष्ट्राच्या जडणघडणीत इस्रायलला महत्त्वपूर्ण स्थान आहे.

आजूबाजूला मुस्लिम देश, त्यांच्याकडून वारंवार मिळणारं आव्हान आणि त्यामुळे थेट निर्माण होणारा अस्तित्वाचा प्रश्न, ही स्थिती इस्रायलनं जन्मापासून अनुभवली. आजूबाजूचे देश अस्तित्वच संपुष्टात आणण्यासाठी इस्रायल मात्र सर्वांना पुरुन उरला आहे. त्यामुळेच भारतासह जगभरात इस्रायलकडे कौतुकानं पाहिलं जातं. मात्र आजूबाजूच्या देशांसाठी कायम कर्दनकाळ ठरलेला इस्रायल भारतासाठी नेहमीच चांगला मित्र राहिला आहे. महाराष्ट्र आणि इस्रायलचे संबंध तर कायम सलोख्याचे राहिले आहेत.

लिओरा मिका जोसेफ यांनी मुंबईतील इस्रायली दूतावासात अनेक वर्षे सेवा बजावली. त्यावेळच्या अनेक आठवणी लिओरा मिका जोसेफ यांच्या मनात आहेत. देशातील दोन सामर्थ्यशाली लोकशाही देशांमधील संबंध जोसेफ यांनी त्यांच्या कार्यकाळात अनुभवले. १९९३ नंतर भारत आणि इस्रायलचे संबंध खऱ्या अर्थानं बहरले. विकसनशील देशांसाठी इस्रायलकडून विकास कार्यक्रम राबवला जातो. माशाव नावानं हा कार्यक्रम ओळखला जातो. माशाव उपक्रमाचा महाराष्ट्राला मोठा फायदा झाला आहे.

वैद्यकीय सुविधा, कृषी, समाजसेवा, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांशी संबंधित प्रशिक्षण ‘मासाव’ अंतर्गत दिलं जातं. या उपक्रमांतर्गत अनेक देशांमधील व्यावसायिकांना इस्रायलमध्ये प्रशिक्षणासाठी निमंत्रित केलं जातं. ‘मासाव’मध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाचा फायदा जगभरातील अनेकांना झाला आहे. यामध्ये मराठी टक्का मोठा असल्याचं लिओरा मिका जोसेफ सांगतात. “शरद पवार यांचे बंधू आप्पासाहेब पवारदेखील १९६० च्या सुमारास इस्रायलला गेले होते,” असे जोसेफ यांनी सांगितले.

पुण्यातील जवळपास २० ते २५ डॉक्टरांनी ‘माशाव’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतल्याचं लिओरा मिका जोसेफ सांगतात. वैद्यकीय क्षेत्रासोबतच कामगार क्षेत्राशी संबंधित अनेक दिग्गजांनीदेखील इस्रायलला भेटी दिल्या आहेत. सोमनाथ दुबे, शरद राव, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी भारत-इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यापूर्वीच इस्रायलला भेटी दिल्या होत्या. भारत आणि इस्रायलमध्ये आज अतिशय उत्तम संबंध आहेत. मात्र कोणतेही राजनैतिक संबंध नसताना, या दोन्ही देशांमधील लोकांनी परस्परांसोबत सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले, हे विशेष.