पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या तीन दिवसीय इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी येथील भारतीय समुदायाला संबोधित केलं. तेल अवीवमधील कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात हजारोंच्या संख्यने भारतीय नागरिक उपस्थित होते. यावेळी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूही उपस्थित होते. मोदींनी आपल्या भाषणात तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. एक प्रकारे मोदींनी भारतीय समुदायासाठी खास ‘गिफ्ट’ दिल्याचं मानलं जात आहे. तेल अवीव ते दिल्ली-मुंबईसाठी विमान सेवा, इस्रायलमध्ये लष्करी सेवा बजावलेल्या भारतीय नागरिकांना ओसीआय कार्ड (भारतीय नागरिकत्व) आणि भारतीय सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यात येईल, अशा तीन महत्त्वपूर्ण घोषणा मोदी यांनी यावेळी केल्या.

गेल्या ७० वर्षांत पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलमध्ये येणं ही माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. यावेळी मोदींनी पुन्हा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची स्तुती केली. इस्रायलमध्ये आल्यानंतर त्यांनी दिलेली साथ आणि दिलेला सन्मान हा सव्वाशे कोटी भारतीय जनतेचा सन्मान आहे असं मला वाटतं, असं मोदी यांनी सांगितलं. नेतान्याहू आणि माझ्यात एक विशेष समानता असून आम्हा दोघांचाही स्वातंत्र्यानंतर जन्म झाला आहे. नेतान्याहू स्वतंत्र इस्रायल आणि माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला, असं मोदी म्हणाले.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि इस्रायल यांनी विविध क्षेत्रांतील सात करारांवर स्वाक्षरी केली. जागतिक शांतता आणि स्थैर्याला धोका असलेल्या दहशतवादाचा बिमोड करण्याचा निर्धार पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी चर्चेनंतर बोलताना व्यक्त केला. भारत-इस्रायल यांच्यातील नात्याची गाठ स्वर्गातच बांधली असल्याची टिप्पणी करत नेतान्याहू यांनी उभयपक्षी संबंध दृढ असल्याची ग्वाही दिली.