पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बोगद्याचं उद्धाटन करण्यात आलं असून आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही, तर हिमालच प्रदेशातील करोडो लोकांचाही गेल्या कित्येक दशकांची प्रतिक्षा संपली आहे असे कौतुगोद्गार त्यांनी काढले. या बोगद्यामुळे मनाली आणि केलॉन्गमधील अंतर तीन ते चार तासांनी कमी होईल असंही त्यांनी सांगितलं.

हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. भारताच्या युद्धनीती विषयक धोरणांमध्ये हा बोगदा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे.

उद्घाटनावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी बोगद्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. “अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते २००२ मध्ये भूमीपूजन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आलेल्या सरकारने या कामाकडे दुर्लक्ष केलं होतं. परिस्थिती अशी होती की, २०१३-१४ पर्यंत फक्त १३०० मीटरपर्यंतच बोगद्याचं काम झालं होतं. तज्ञ सांगताता ज्या वेगाने बोगद्याचं काम होत होतं, ते पाहता २०४० पर्यंतही काम पूर्ण झालं नसतं,” असा दावा नरेंद्र मोदींनी केला.

“जर आज तुमचं वय २० असेल तर त्यामध्ये अजून २० जोडा. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला हा दिवस पहायला मिळाला असता, हे स्वप्न पूर्ण झालं असतं. जर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जायचं असेल, देशातील लोकांची विकास व्हावा अशी इच्छा असेल तर वेग वाढवावा लागतोच,” असंही मोदींनी म्हटलं. फक्त सहा महिन्यात आम्ही बोगद्याचं २६ वर्षांचं काम पूर्ण केलं अशी माहिती नरेंद्र मोदींनी यावेळी दिली. या बोगद्याप्रमाणे इतर अनेक प्रकल्पांसोबतही दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला.