देशभरात आज ७३ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सरकारने तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यावरही घेतलेल्या निर्णयावर भाष्य केलं. मुस्लीम महिलांची तिहेरी तलाक प्रथेच्या नावाखाली कुचंबना होत होती असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. जर आपण सती आणि बालविवाहसारख्या प्रथा रद्द करु शकतो तर मग तिहेरी तलाक का नाही? अशी विचारणा यावेळी नरेंद्र मोदींनी केली.

“तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांना खूप त्रास सहन करावा लागत होता. मुस्लीम महिलांच्या मनात खूप भीती निर्माण झाली होती”, असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. जर सती आणि बालविवाहसारख्या प्रथा रद्द करु शकतो तर तिहेरी तलाक का नाही ? असा सवाल यावेळी नरेंद्र मोदींनी विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दहशतवादावरही भाष्य केलं. “दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारताकडून पर्दाफाश होत आहे. आज केवळ भारतच नाही तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांनाही दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढत आहोत”, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

कलम ३७० बद्दल बोलताना मोदींनी सांगितलं की, “अनेकांनी कलम ३७० रद्द करण्यासाठी पाठिंबा दिला. परंतु काही लोक राजकारण करण्यासाठी याला विरोध करत आहेत. कलम ३७०, कलम ३५ ए रद्द केल्याने जर राज्याचं भाग्य बदलणार होते, तर गेल्या अनेक वर्षांपासून हुमत असून ते ताटकळत का ठेवलं ?. माझ्यासाठी देशाचं हितच सर्वकाही आहे. त्यामुळे ७० वर्षात जे काम झाले नाही ते १० दिवसात केले”.

“तिन्ही संरक्षण दले देशाचा अभिमान आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिने तिन्ही दलांमध्ये समन्वयाची गरज आहे. त्यासाठी एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा आज करत आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ यांची नियुक्ती सरकार करणार आहे. त्यामुळे संरक्षण दले अधिक सक्षम होतील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.