सपा नेते आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस चॅलेंजवर जळजळीत टीका केली आहे. देशात आपले सैनिक मारले जात आहेत, प्रामाणिक माणसे मारली जात आहेत. विद्यार्थी, पत्रकार यांची हत्या होते आहे.. अशात देशाचे पंतप्रधान मात्र फिटनेस करायला सांगत आहेत. एकीकडे देशातली परिस्थिती बिघडत चालली आहे पंतप्रधान मात्र दंड बैठका काढण्यात मग्न आहेत. पंतप्रधान फिट आणि देश अनफिट अशी स्थिती देशात आहे असे म्हणत आझम खान यांनी टीका केली आहे.

पाहा व्हिडिओ

सपा नेते आझम खान यांनी याआधीही अनेकदा अशाचप्रकारे वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. २०१७ मध्ये उत्तरप्रदेशातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत एक गट दोन महिलांचा विनयभंग करत असल्याचे दिसत होते. यावर भाष्य करताना ज्या ठिकाणी छेडछाड होईल त्या ठिकाणी मुलींनी महिलांनी जाऊच नये असे वक्तव्य आझम खान यांनी केले होते.

तसेच उत्तर प्रदेशात छेडछाड, महिलांशी गैरवर्तन हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मतदारांनी निवडणुकीत भाजपाला मतदान केल्याने आता त्यांना त्याचे परिणाम दिसत आहेत असेही म्हटले होते. तर कारगील युद्धात हिंदू नाही तर मुस्लिम जवानांनी विजय मिळवून दिला असेही वक्तव्य त्यांनी २०१४ मध्ये केले होते. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस चॅलेंजवर टीका केली आहे. एएनआयने या संदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे.