पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर सुमारे ६० टक्के फेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे जगातील नेत्यांच्या तुलनेत सर्वाधिक फेक फॉलोअर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासूनच नरेंद्र मोदी ट्विटरवर सक्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांमध्ये जगातले लोक आहेत असेही सांगितले जाते. मात्र ट्विटरने काही दिवसांपूर्वीच केलेल्या ऑडिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ६० टक्के फॉलोअर्स फेक अर्थात बनावट असल्याची बाब समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर सुमारे ४ कोटी लोक फॉलो करतात. त्यापैकी ६० टक्के पेक्षा जास्त फॉलोअर्स बनावट असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्या फॉलोअर्सपैकी एकूण ३७ टक्के फॉलोअर्स बनावट आहेत. तर पोप फ्रान्सिस यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्या फॉलोअर्सपैकी एकूण ५९ टक्के फॉलोअर्स बनावट आहेत. सौदीचे किंग सलमान यांचे ८ टक्के फॉलोअर्स फेक आहेत अशीही माहिती ट्विटरने समोर आणली आहे.

ट्विटरने दिलेल्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुमारे २ कोटी ४१ लाख ८० हजार फॉलोअर्स फेक आहेत. ट्विटरने २१ फेब्रुवारी २०१८ ला आपला अहवाल प्रकाशित केला त्यातून हि माहिती समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही ५१ टक्के फेक फॉलोअर्स असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो करणारे फेक फॉलोअर्स अनेक आहेत असेही समोर आले आहे.