नुकतीच ‘टाइम’ मासिकानं २०१८ मधल्या जगातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींची यादी जाहीर केली. आश्चर्य म्हणजे या यादीत भारतातील एकाही राजकारणी व्यक्तीचा समावेश नाही. ‘टाइम’च्या गतवर्षाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींचा समावेश होता, मात्र यावर्षी मोदींना या यादीतून वगळण्यात आलंय. भारतात प्रभावशाली नेता म्हणून गणल्या जाणाऱ्या मोदींचा प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र कमी झाल्याचं दिसून येत आहे. उन्नाव, कठुआ, सुरत बलात्कार प्रकरण, जीएसटी, नोटाबंदी यांसारख्या अनेक कारणांमुळे देशातील वातावरण खूपच तापलं आहे आणि याचा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर होत असल्याचं म्हटलं जात आहे.

२०१७ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या जगभरातील प्रभवाशाली व्यक्तींच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश होता. मोदींसोबत २०१७ च्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांचा समावेश होता. यावर्षीच्या यादीतही या नेत्यांचा समावेश आहे पण, मोदींचं नाव मात्र या यादीतून वगळ्यात आलं आहे. ‘टाइम’नं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत ब्रिटनचं प्रिन्स हॅरी, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, जपानचे पंतप्रधान शिंझो आबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याही नावांचा समावेश आहे. दुर्दैवानं भारतातील एकाही राजकारणी व्यक्तीचा समावेश या यादीत करण्यात आलेला नाही.

भारतातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींचं नाव नसलं तरी दीपिका, विराट कोहली ओला कॅबचे सहसंस्थापक भावीश अगरवाल यांचा समावेश आहे. या यादीत समाविष्ट झालेली दीपिका ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री आहे. २०१६ मध्ये या यादीत प्रियांका चोप्राचा सहभाग होता.