पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यू इंडियातील सांताक्लोज असून ते नवभारतासाठी चांगली बातमीच घेऊन येतात, असे सांगत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनंतकुमार यांनी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. तिहेरी तलाकबंदीबाबतच्या विधेयकाला विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर त्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तरही दिले. नरेंद्र मोदी हे न्यू इंडियातील सांताक्लोज आहेत, असे त्यांनी सांगितले.

मंगळवारी काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी नरेंद्र मोदींना चिमटा काढला होता. सध्या जगात पांढऱ्या दाढीचा म्हातारा माणूस (सांताक्लॉज) नकळतपणे लोकांच्या घरात जाऊन त्यांच्या मोज्यात पैसे आणि भेटवस्तू ठेवत आहे. मात्र, भारतातील परिस्थिती याउलट आहे. येथे पांढऱ्या दाढीचा वृद्ध माणूस टीव्हीतून तुमच्या घरात शिरतो. घरात शिरल्यानंतर तो लोकांची पाकिटं, कपाट, लॉकर सर्व ठिकाणचे पैसे काढून घेतो. त्यामुळे तुमच्या अंगावर फक्त मोजेच शिल्लक राहतात, असे ट्विट त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर अनंतकुमार यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानवरुन बेफाम आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी लावून धरली होती. बुधवारी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या विधानावरुन काँग्रेस खासदार आक्रमक झाले. भाजप राज्यघटना बदलेल, अशा स्वरुपाचे विधान अनंतकुमार हेगडे यांनी केले होते. या विधानाचा दाखला देत काँग्रेस खासदार गुलाम नवी आझाद यांनी राज्यसभेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. एखाद्याला राज्यघटनेवर विश्वास नसेल तर त्याला खासदारपदावर राहण्याचा हक्क देखील नाही, असे त्यांनी सांगितले.