निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे पत्र

उन्नाव व कथुआ येथील बलात्कारांची प्रकरणे लक्षात घेतली तर सध्याचा स्वातंत्र्योत्तर भारतातील एक काळा कालखंड सुरू आहे असे म्हणायला हरकत नाही, अशी टीका काही निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात केली असून त्यात मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. दोन्ही घटना भाजप शासीत राज्यात घडल्या असून त्याची जबाबदारी देशाचे प्रमुख व भाजपचे सर्वेसर्वा या नात्याने मोदींवरच आहे, असा आरोप त्यात केला आहे.दोन्ही घटना भाजप शासीत राज्यात घडल्या असून त्याची जबाबदारी देशाचे प्रमुख व भाजपचे सर्वेसर्वा या नात्याने मोदींवरच आहे, असा आरोप त्यात केला आहे.

या सगळ्या घटनांची जबाबदारी स्वीकारून चुकांची दुरूस्ती करण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी मौन पाळले, जेव्हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जनक्षोभ उफाळून आला तेव्हा त्यांनी मौन सोडले असे ४९ माजी अधिकाऱ्यांच्या सह्य़ा असलेल्या या पत्रात म्हटले आहे. कथुआ व उन्नाव येथील घटना या देशासाठी लांच्छनास्पद आहेत व आमच्या मुलींना न्याय दिला जाईल, जे कुणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही, असे मोदी यांनी शुक्रवारी सांगितले होते.

पत्रात म्हटले आहे की, स्वातंत्र्योत्तर भारतातील हा काळा कालखंड असून राजकीय पक्ष, नेते व सरकार यांचा अशा घृणास्पद घटनांना दिलेला प्रतिसाद पुरेसा तर नाहीच, शिवाय तो क्षीण आहे.

जम्मूतील कथुआ येथील आठ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेबाबत पत्रात म्हटले आहे, की यातील पाशवीपणा, नृशंसता यातून देश नीतिभ्रष्टतेच्या कुठल्या पातळीवर गेला आहे याची जाणीव होते. जेव्हा कुणी राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घेतो तेव्हा आम्हाला अशी आशा आहे, की ज्या सरकारचे तुम्ही प्रमुख आहात व ज्या पक्षाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता त्यांनी या अध:पतनाने खडबडून जागे व्हायला हवे. समाजाला लागलेली ही कीड निपटून काढून सर्वाना आश्वस्त केले पाहिजे. विशेष करून अल्पसंख्याक समाजाला सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवले पाहिजे. त्यांना जीवन व स्वातंत्र्याची भीती वाटता कामा नये. पण ती आशाच उद्ध्वस्त झाली आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

कथुआ येथील घटनेबाबत तो  संघ परिवाराच्या सांस्कृतिक बहुसंख्याकवादाचा भांडखोर व आक्रमक नमुना असल्याचे म्हटले असून पाशवी जातीय वृत्तींचे धाष्टर्य़ त्यामुळे वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदूुत्वाच्या नावाखाली माणसांना एकमेकांविरोधात लढवले जात आहे. समाज माणूस म्हणून अपयशी ठरत आहे. पर्यायाने देशही वांशिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा राखण्यात अपयशी ठरत आहे. सहिष्णुता, सहवेदना, बंधुत्व या भावना आपल्या समाजाच्या मुळाशी आहेत, पण त्याच नष्ट केल्या जात आहेत.

उत्तर प्रदेशात एका मुलीवर भाजपच्या आमदाराने बलात्कार केला. मते मिळवण्यासाठी जेव्हा राजकीय पक्ष माफिया व गुंडापुंडावर विसंबून राहतात तेव्हा त्यातून पुरूषी सरंजामशाही जन्म घेते.  त्यातूनच मग असे गुंडपुंड बलात्कार, खून व खंडणी गोळा करण्याचे दु:साहस करतात. त्यातून ते त्यांच्या व्यक्तिगत बळाचे ओंगळ प्रदर्शन करतात. सत्तेचा गैरवापर आणि माज हा तर गैरच, पण त्यापेक्षाही राज्य सरकारने यावर दिलेला सुस्त व पक्षपाती प्रतिसाद हा भयानक होता. गुन्हेगारांना पकडण्याऐवजी पीडिता व तिच्या कुटुंबीयांचा छळ  केला गेला. आपल्या प्रशासन पद्धती किती विकृतीच्या आहारी गेल्या आहेत हेच दिसून आले, असे पत्रात म्हटले आहे. एकूण ४९ माजी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या एकूण ४९ माजी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या पत्रावर असून त्यात पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर,  प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकार, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलियो रिबेरो, माहिती अधिकार कार्यकर्त्यां अरूणा रॉय व माजी माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला यांचा समावेश आहे.

पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागावी

दोन्ही प्रकरणे जेथे घडली तेथे पंतप्रधान मोदी , तुमच्या भाजपचे सरकार आहे, तुम्ही पक्षात सर्वोच्च आहात. तुम्ही व तुमचे पक्षाध्यक्ष यांच्या हातात सगळी नियंत्रणे आहेत, असे असताना या  भयानक घटनांना इतरांपेक्षा तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही आता उन्नाव व कथुआ येथील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटा, त्यांची  माफी मागा.