पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. भारताच्या जागतिक संबंधांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा जपानची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. हे संबंध आजपासून नसून, कित्येत दशकांपासून आहेत. सुसंवाद आणि दोन्ही देश एकमेकांच्या संस्कृतीचा आदर यामागील मुख्य कारण असल्याचं यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींचं भाषण संपताच यावेळी वंदे मातरम आणि जय श्रीराम अशी घोणषाबाजी करण्यात आली.

‘सात महिन्यांनी पुन्हा एकदा जपानमध्ये येणं मी माझं भाग्य समजतो. ही योगायोगाची गोष्ट आहे जेव्हा मी गेल्यावेळी येथे आलो होतो तेव्हा निकाल आले होते. तुम्ही सर्वांनी माझे मित्र शिंजो आबे यांच्यावर विश्वास दाखवलात. आज मी येथे आलो आहे आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीनेही या प्रधान सेवकारवर विश्वास दाखवला आहे’, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

१३० कोटी लोकांनी सक्षम सरकारची निवड केली. ही मोठी गोष्ट आहे. तीन दशकांनंतर पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा बहुमताचं सरकार निवडून आणलं असं मोदींनी यावेळी म्हटलं. ‘सबका साथ सबका विकास आणि त्यात लोकांनी सबका विश्वास आणलं. हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत. भारताला अजून सक्षम करणार आहोत’, असं त्याना यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना मोदींनी सांगितलं की, ‘मी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर माझे मित्र शिंजो आबे यांच्यासोबत मिळून भारत-जपानधील संबंध अजून मजबूत करण्याची संधी मिळाली. आम्ही राजनैतिक संबंधांपुरतं मर्यादित न राहता लोकांपर्यंत पोहोचलो’.