देशभरातील स्थितीचा आढावा

नवी दिल्ली : करोना संसर्गाचे प्रमाण जास्त असणाऱ्या राज्यांत केंद्रीय स्तरावरून त्या त्या वेळी देखरेख ठेवली गेली पाहिजे आणि त्यानुसार राज्यांना मार्गदर्शन केले गेले पाहिजे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठकीत दिला.

या बैठकीत मोदी यांनी देशातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, निती आयोगाचे सदस्य, मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा आदी उपस्थित होते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात करोना नियंत्रणात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले गेले. त्याचे अन्य राज्यांनी अनुकरण केले पाहिजे, अशी सूचना मोदी यांनी केली.

दिल्लीमध्ये करोनाचा संसर्ग साडेपाच लाख लोकांना होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर राजधानीतील करोनासंदर्भातील निर्णयप्रक्रिया पूर्णत: केंद्रीय गृह मंत्रालयाने हाती घेतली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य प्रशासन, केंद्रीय आरोग्य विभाग आदींच्या सातत्याने बैठका घेत धोरणे राबवली. दिल्लीत करोनाचे रुग्ण वाढत असले तरी करोनामुक्त होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असून मृत्युदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. दिल्लीतील या प्रयत्नांचे मोदींनी कौतुक करून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आधिपत्याखाली अन्य राज्यांनीही करोना साथरोग आटोक्यात आणावा, असे सुचविले. टाळेबंदी शिथिल केल्यामुळे लोकांमध्ये बेफिकिरी येण्याचा धोका असून ते टाळण्यासाठी राज्य व केंद्राने सतर्क राहिले पाहिजे. अधिकाधिक जनजागृती केली जावी तसेच प्रादुर्भाव रोखण्याला प्राधान्य द्यावे, असेही मोदींनी सांगितले.

देशात २४ तासांमध्ये  २७ हजार रुग्ण

देशात गेल्या चोवीस तासांमध्ये २७ हजार ११४ रुग्णांची भर पडली असून देशभरात एकूण करोना रुग्णसंख्या ८ लाख २० हजार ९१६ झाली आहे. चार दिवसांत एक लाख नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण २२ हजार १२३ मृत्यू झाले आहेत.