मथुरा, उत्तर प्रदेश : एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले. हे प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून ते जनावरे व माशांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू ओढवतो, तसेच माणसांवरही त्याचे अनिष्ट  परिणाम होत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करण्याच्या ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी कचरावेचक महिलांसमवेत जमिनीवर बैठक मारून कचऱ्यातून प्लास्टिक बाजूला करण्याचे काम काही काळ केले.  मोदी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाला २०२४ पर्यंत केंद्र सरकार १२६५२ कोटी रुपये मदत देणार आहे. यात ५०० दशलक्ष जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.  ३६ दशलक्ष वासरांचे लसीकरण यात केले जाणार असून त्यामुळे त्यांचे ब्रुसेलोसिस रोगापासून संरक्षण होईल. यात २०२५ पर्यंत रोगनियंत्रण व २०३० पर्यंत रोग निर्मूलन असे दोन भाग आहेत.

मोदी यांनी राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा शुभारंभ केला, त्या वेळी त्यांनी शेतक ऱ्यांशी संवाद साधला.

प्लास्टिक  कचरा वेगळा करणाऱ्या २५ कचरावेचक महिलांशी मोदी बोलले, त्यांना काही प्रश्न विचारले, या महिलांचा गौरवही करण्यात आला.  २०२२  पर्यंत एकदा वापराच्या प्लास्टिकला हद्दपार करण्याचे सरकारने ठरवले आहे, त्यासाठी प्लास्टिक गोळा करणे व त्याचा फेरवापर करणे गरजेचे आहे असे मोदी यांनी या वेळी सांगितले.

वस्तूंची यादी जाहीर करणार

एकदा वापराचे प्लास्टिक म्हणजे नेमक्या कुठल्या वस्तू याची यादी सरकार जाहीर करणार आहे. त्यामुळे त्यांचा वापर टाळणे लोकांना शक्य होणार आहे.

प्लास्टिक बंदीचा निर्णय अयोग्य – रमेश

नवी दिल्ली : एकदाच वापराच्या प्लास्टिकवरील प्रस्तावित बंदीच्या निर्णयावर काँग्रेस नेते व माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी टीका केली आहे. अशा निर्णयातून केवळ वर्तमानपत्रांचे मथळे साजरे होतील व सरकारची खरी पर्यावरण कामगिरी झाकली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

प्लास्टिक उद्योगात लाखो लोक काम करतात, त्यामुळे पर्यावरण मंत्री असताना आपण प्लास्टिकवर सरसकट बंदीस विरोध केला होता असे सांगून ते म्हणाले,की ‘मुख्य प्रश्न प्लास्टिकची विल्हेवाट लावणे हा आहे, प्लास्टिक कचऱ्याचा फेरवापर करणेही महत्त्वाचे आहे. एकदाच वापराच्या प्लास्टिकवर सरसकट बंदीला मी मंत्री असतानाच विरोध केला होता.’

पंतप्रधान मोदी यांनी अलीकडे ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या’ कार्यक्रमात प्लास्टिक वापरावर नियंत्रण  ठेवण्याचे आवाहन केले होते, तसेच स्वातंत्र्यदिनी त्यांनी एकदा वापराच्या प्लास्टिकविरोधी जनचळवळीची हाक दिली होती. प्लास्टिकवर सरसकट बंदी घालणे हे देश आर्थिक मंदीसदृश स्थितीकडे वाटचाल करीत असताना फार योग्य नाही, असे मत रमेश यांनी व्यक्त केले आहे.