घसरता भूजल स्तर वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन योजना सुरू केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेची घोषणा केली.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरा केला जात आहे. जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा नेत्यांनी सदैव अटल स्मतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

त्यानंतर विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात मोदींनी अटल भूजल योजनेची घोषणा केली. मोदी म्हणाले, “एकीकडे जल जीवन मिशन प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहचवणार आहे. त्याचप्रमाणे अटल भूजल योजना असेल. ज्या क्षेत्रामध्ये भूजल स्तर खुप खालावलेली आहे, त्या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करेल,” असं मोदी योजनेची घोषणा करताना म्हणाले.

यावेळी जल शक्ती मिशन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मनोगत व्यक्त केलं.
केंद्र सरकारने अलीकडेच अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीला मंजूरी दिली आहे. पाच वर्षांच्या (२०२०-२१ ते २०१२४-२५) काळात सहा हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. या योजना सुरूवातीला देशातील महाराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर या सात राज्यात राबवण्यात येणार आहे. यात आठ हजार ३५० ग्राम पंचायती आणि ७८ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.