X

वाराणसीत ५५० कोटींहून अधिक रकमेच्या प्रकल्पांची सुरुवात

चार वर्षांपूर्वी येथील जनतेने वाराणसीत बदल घडविण्याचे ठरविले आणि आजमितीला ते बदल स्पष्ट दिसत आहेत.

जनताच आपले पक्षश्रेष्ठी – नरेंद्र मोदी

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघात ५५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची सुरुवात केली. या लोकसभा मतदारसंघातली जनताच आपले पक्षश्रेष्ठी असल्याचे या वेळी मोदी म्हणाले.

या शहरात केलेले काम सुस्पष्ट दिसत आहे, गेल्या चार वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलला आहे, यापूर्वीच्या सरकारच्या काळात सर्व देवाच्या भरवशावरच होते, असे मोदी यांनी आपला दोन दिवसांचा दौरा आटोपताना स्पष्ट केले.

वाराणसीचा खासदार या नात्याने आपण केलेल्या कामांची माहिती मतदारांना देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मोदी जाहीर सभेत म्हणाले. तुम्ही पंतप्रधानपदाला जबाबदारी दिली असली तरी लोकसभेचा सदस्य आणि मतदारसंघातील खासदार या नात्याने केलेली कामे तुमच्यासमोर ठेवणे ही तितकीच आपली जबाबदारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

मतदारसंघातील जनताच आपले मालक आणि पक्षश्रेष्ठी आहेत, त्यामुळे खर्च झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब तुम्हाला देणे ही आपली जबाबदारी आहे. या शहराचा वारसा आणि परंपरा अबाधित ठेवून बदल घडविण्याचा आपण प्रयत्न केला आहे. यापूर्वी तुम्ही वाराणसी शहर ‘भोले के भरोसे’ असल्याचा प्रत्यय घेतला आहे, असे ते म्हणाले.

चार वर्षांपूर्वी येथील जनतेने वाराणसीत बदल घडविण्याचे ठरविले आणि आजमितीला ते बदल स्पष्ट दिसत आहेत. जवळपास ५५० कोटी रुपयांचे प्रकल्प जनतेला अर्पण करण्यात आले आहेत अथवा त्यांची पायाभरणी करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. एकात्मिक ऊर्जा विकास योजना आणि अटल इनक्युबेशन सेंटर यांचाही अनेक प्रकल्पांमध्ये समावेश आहे.