यापूर्वी बँकेत खाते नसलेल्या १५ कोटी लोकांना बँकांचे खातेदार बनवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवसाला एक रुपया भरून विमा संरक्षणासह सामाजिक सुरक्षेच्या तीन योजना सुरू केल्या. गरिबांना सक्षम करण्याची गरज आहे, मदतीची नाही असे मोदी म्हणाले.
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना अशा या तीन योजना देशभरातील ११५ ठिकाणी एकाच वेळी सुरू करण्यात आल्या. कोलकात्यातील कार्यक्रमात प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या.
देशातील ८० ते ९० टक्के लोकांना विम्याचे संरक्षण नाही किंवा निवृत्तिवेतन मिळण्याची काहीही शक्यता नाही. अशा लोकांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या या योजना १ जूनपासून अमलात येतील. पहिल्या सात दिवसांत चाचणीमध्ये बँकांनी ५.०५ कोटी लोकांची नोंदणी केली असल्याचे मोदी यांनी
सांगितले.
जनधन योजनेच्या १५ कोटी खात्यांमध्ये चार महिन्यात १५,८०० कोटी रुपये जमा करण्यात आले. हा देश, हे सरकार आणि आमच्या बँका तुमच्यासाठी असल्याचे मी गरिबांना सांगितले आहे. गरिबांना ‘सहारा’ नको आहे, तर ‘शक्ती’ हवी आहे. आपण आपली विचार करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.