आंध्रप्रदेशची नवीन राजधानी अमरावतीचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त गुरुवारी संपन्न झाला. आंध्रप्रदेशातील अमरावतीला राज्याची राजधानी म्हणून विकसीत करण्याचा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्याची विधानसभा इमारत तयार करण्यात येणाऱया जागेवर मोदींनी भूमीपूजन करून या प्रकल्पाचा शुभारंभ केला. अमरावतीला देशातील लक्षवेधी शहर बनविण्याचा मानस असून हे शहर सर्व अद्ययावत सोयी-सुविधांनी समृद्ध असलेली देशातील सर्वोत्कृष्ट राजधानी बनेल, असा विश्वास चंद्राबाब नायडू यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदींनीही आपल्या भाषणात चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यपद्धतीनेच भरभरून कौतुक केले. शहरांचा विकास हे प्रत्येक राज्याने आव्हान न समजता त्याकडे संधी म्हणून पाहायला हवे. आंध्र असो वा तेलंगणा दोघांचाही तेलगू हा समान धागा आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांचा एकमेकांच्या सहकार्याने विकास झाला पाहिजे, असे मोदी यावेळी म्हणाले.