News Flash

प्रकल्प लटकवणे हेच पूर्वीच्या सरकारचे काम, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला

'लटकाना, अटकाना आणि पटकाना' हे पूर्वीच्या सरकारचे धोरण होते.

PM Narendra Modi: मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन करण्यात आले. (छायाचित्र: एएनआय)

विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजनानंतर त्यांनी विकासकामांची माहिती देताना पूर्वीच्या सरकारच्या कारभारामुळे अनेक प्रकल्प लटकल्याचा आरोप केला. ‘लटकाना, अटकाना आणि पटकाना’ हे पूर्वीच्या सरकारचे धोरण होते. कोणताही प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी ते लटकवण्यावरच पूर्वीच्या सरकारचा भर होता. त्यांच्या काळात सुमारे १० लाख कोटींचे प्रकल्प लटकले होते. पण आमच्या सरकारने ते कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन करण्यात आले. त्याचवेळी त्यांनी जेएनपीटी टर्मिनलचे लोकार्पणही केले. त्यानंतर बोलताना मोदींनी विकासकामांची माहिती देताना विरोधी पक्षांवर टीका केली. यावेळी त्यांनी २०२२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक पूर्ण होईल, असा विश्वासही व्यक्त केला. त्यांनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. विशेष म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रमावर बहिष्कार होता.

ते म्हणाले, सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी भारतातील विमानतळावर जितकी वाहतूक होती. आज त्याच्यापेक्षाही जास्त वाहतूक ही एकट्या मुंबई विमानतळावरून होते. ज्याप्रमाणे बससाठी गर्दी असते त्याप्रमाणे विमान प्रवासासाठी गर्दी असते. आपल्या देशात हवाई धोरणच नव्हते. पण आमच्या सरकारने हे धोरण अस्तिवात आणले. आम्ही विचार केला हवाई चप्पल घालणाऱ्या व्यक्तीनेही हवाई प्रवास केला पाहिजे आणि ते आम्ही प्रत्यक्षातही आणले. ९०९ विमाने खरेदी करण्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. हवाई क्षेत्रामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, असेही त्यांनी म्हटले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी मिळून अनेक वर्षे झाली. आतापर्यंत अनेकांनी आश्वासने दिलीत. या प्रश्नावरून अनेक आमदार, खासदार, सरकारे येऊन गेली. पण काम काही पुढे सरकलेच नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात याचे स्वप्न पाहण्यात आले आणि मी पंतप्रधान बनताच हा प्रश्न मार्गी लावला, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. नवी मुंबई विमानतळ हे देशातील सर्वांत पहिले आणि मोठे ग्रीन फिल्ड विमानतळ असेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी. विद्यासागर राव आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 5:05 pm

Web Title: pm narendra modi lays foundation stone of navi mumbai international airport
Next Stories
1 बडोद्यातील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्री बंद; विक्रेत्यांचे धरणे आंदोलन सुरु
2 LinkedIn सोशल नेटवर्किंग साइट की सेक्सवर्कर्सचा नवा अड्डा?
3 नीरव मोदीचे राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांशी संबंध; राम माधव यांचा काँग्रेसवर पलटवार
Just Now!
X