दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेतच. तशातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारवर सडकून टीका केली. “नव्या संसदेच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारचे २० हजार कोटी रुपये आहेत. पंतप्रधानांसाठी विशेष विमान खरेदी करण्यासाठी केंद्राकडे १६ हजार कोटी रुपये आहेत. पण उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे १४ हजार कोटी रुपये नाहीत. २०१७ पासून उत्तर प्रदेशात उस उत्पादनावरील भाव वाढवण्यात आलेला नाही. हे सरकार केवळ फक्त अब्जाधिशांपुरता आणि मोठ्या व्यापाऱ्यांपुरताच विचार करतं,” असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

आणखी वाचा- नव्या संसदेच्या बांधकामावरुन सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी; सर्व बांधकाम थांबवण्याचे आदेश

आणखी वाचा- शेतकऱ्यांसाठी कायपण… मुस्लीम तरुणांनी आंदोलक शेतकऱ्यांसाठी सुरु केली ‘लंगर’ सेवा

भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबरला विरोधी पक्षांनी भारत बंदचं आवाहन केलं आहे. या बंदला काँग्रेसनेदेखील पाठिंबा दिला आहे. “८ डिसेंबरच्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी टाकलेले हे मजबूत पाऊल असणार आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”, अशी भूमिका काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आली.