काश्मीर खोऱ्यातील वाढत्या हिंसाचाराला पाकिस्तानच खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. असे असले तरीही येत्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात होणाऱ्या सार्क राष्ट्रांच्या परिषदेसाठी नरेंद्र मोदी पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनीच ही माहिती दिल्याचे पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
मंगळवारी एका कार्यक्रमात सहभागी होताना बंबवाले यांनी भारत आणि पाकिस्तान उभय देशांनी सर्व विषयांवर चर्चा केली पाहिजे. पण त्यांचा सर्वाधिक भर हा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांवर असला पाहिजे, असे म्हटले आहे. भविष्यात काय होईल, हे मला माहिती नाही. पण सध्यातरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेसाठी पाकिस्तानला येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘कराची कौन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्स’कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याचे ‘डॉन’ने म्हटले आहे.
काश्मीरमधील धुमसत्या परिस्थितीमुळे भारत, पाकिस्तानमधील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. त्यामुळे सार्क परिषदेसाठी नरेंद्र मोदी पाकिस्तानला जाणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण गौतम बंबवाले यांच्या वक्तव्यानंतर वेगळ्या शक्यतेचाही विचार सुरू असल्याचे पुढे आले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये सध्यातरी विश्वासाचा अभाव असल्याचे बंबवाले यांनी मान्य केले. व्यापाराच्या साह्यानेच दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होऊ शकतात. ज्याचा आराखडा २०१२ मध्ये दोन्ही देशांतील सरकारांनी निश्चित केला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दक्षिण आशियामधील दहशतवादाला केवळ एका देशामुळे खतपाणी मिळत असल्याचे भाष्य करत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला टोला लगावला होता. दहशतवाद हा दहशतवाद असतो, या वाक्याचा पुनरुच्चार करत दहशतवादाला पोसणाऱ्यांवर सर्वांनी एकत्र येऊन कारवाई करण्याची गरज असल्याचे आवाहन मोदींनी जी-२० परिषदेत आंतरराष्ट्रीय नेत्यांसमोर सोमवारी केले.