पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हे त्यांच्या भाषणात जनतेला मित्रों मित्रो असे म्हणतात आणि अनिल अंबानींसारख्या बड्या उद्योजकांना भाई. मित्रो मित्रो असे म्हणत त्यानी जनतेच्या खिशातला पैसा काढून अनिल अंबांनींसारख्या भाईंना वाटला अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बिहारमधल्या पुर्णिया या ठिकाणी झालेल्या रॅलीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा चौकीदार या शब्दावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर येण्यापूर्वी सांगत होते की मी पंतप्रधान झालो की तुम्हाला मी जे हवं आहे ते देईन. आता त्यांनी नारा बदलला आता ते म्हणत आहेत हम सब चौकीदार. चौकीदार गरीबांच्या घरी कुठे असतात? चौकीदार तर श्रीमंतांच्या घरी असतात असे म्हणत या शब्दावरून पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीबांचे नाही तर श्रीमंत उद्योजकांचे चौकीदार आहेत अशीही टीका राहुल गांधी यांनी केली. एवढंच नाही तर ते अनिल अंबानींचे चौकीदार आहेत असाही आरोप राहुल गांधींनी केला.

राफेल करारात फेरबदल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींचा तीस हजार कोटींचा फायदा करून दिला असा आरोप करत राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी राफेल करारात घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. तसंच याच राफेल करारावरून चौकीदार चोर है हे घोषवाक्यही प्रसिद्ध केलं आहे. या घोषवाक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी चौकीदार ही मोहीम सुरु केली. त्या मोहीमेवरही आता राहुल गांधींनी टीका केली आहे. चौकीदार श्रीमंताच्या घरचा असतो असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.