१९४२ ते १९४७ ही पाच वर्ष भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाची वर्षे होती. त्याच प्रमाणे आगामी पाच वर्ष म्हणजेच २०१७ ते २०२२ हा कालावधीही देशासाठी महत्त्वाचा असून या पाच वर्षात अस्वच्छता, दारिद्रय, जातीयवाद, दहशतवादाला देशातून हद्दपार करण्याचा संकल्प करुया असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून देशवासीयांना संबोधित केले. मोदींनी सुरुवातीला जीएसटीमुळे झालेल्या बदलांविषयी माहिती दिली. जीएसटीला मी ‘गूड अँड सिंपल टॅक्स’ म्हणतो. जीएसटीने अल्पावधीमध्येच अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दाखवले. ग्राहकांचा आता व्यापाऱ्यांवरील विश्वास वाढला आहे. देशविदेशातील अर्थतज्ज्ञांसाठी जीएसटीची अंमलबजावणी हा कुतूहलाचा विषय ठरेल असा दावा त्यांनी केला. जीएसटी ही फक्त नवी करप्रणाली नाही तर प्रामाणिकपणाच्या संस्कृतीची नवी मुहूर्तमेढ आहे, जी येत्या काळात अर्थव्यवस्था आणखी बळकट करेल असेही मोदींनी म्हटले आहे. हे सामाजिक सुधारणेचे अभियान असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑगस्ट महिना भारतासाठी क्रांतिकारी महीना आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी भारतात असहकार चळवळ सुरु झाली. ऑगस्ट १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. १८५७ ते १९४२ या कालावधीत स्वातंत्र्यांसाठी देशवासीय एकत्र आले, त्रास सोसला आणि इतिहासातील हीच मंडळी आज देशाला प्रेरणा देतात असे मोदींनी सांगितले. आता ‘करेंगे या मरेंगे’ पेक्षा भारताच्या विकासात योगदान देण्याची वेळ आहे. प्रत्येकाने ऑगस्ट महिन्यात देशासाठी संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केला. २०१७ ते २०२२ पर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद हद्दपार करण्यासाठी लढा द्यावा असे त्यांनी नमूद केले.