लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली. परंतु यापूर्वी चर्चा झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याची. अखेरच्या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्यानंतर मोदी शनिवारी केदानाथला पोहोचले. केदारनाथाच्या पूजेनंतर 2 किलोमीटर पायी चालून ते या ठिकाणी असलेल्या पवित्र गुफेत पोहोचले. या गुफेत त्यांनी तब्बल 17 तास ध्यानधारणा केली. यादरम्यान, या गुफेत कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती.

पंतप्रधानांनी ज्या गुफेत ध्यानधारणा केली ती गुफा नेहरु इंस्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगने तयार केली आहे. त्या गुफेची खासियत म्हणायची तर ती 5 मीटर लांब आणि 3 मीटर रूंद आहे. यामध्ये बेड, टॉयलेट, वीज आणि टेलिफोनसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहे. समुद्र सपाटीपासून ही गुफा तब्बल 12 हजार फुट उंचीवर असून सध्या केवळ प्रायोगिक तत्त्वावर ही गुफा तयार करण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी या गुफेत सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले होते. तसेच या गुफेच्या बाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांवरही नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली होती. दरम्यान, मोदींसाठी रात्रीच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मंगेश घिल्डियाल यांनी दिली. तसेच थंड हवामानामुळे या ठिकाणी हिटर, गिझरचीही व्यवस्था करण्यात आली होती. याव्यतिरिक्त सुरक्षा रक्षकांसाठी टेंटही लावण्यात आले होते.

केदारनाथ परिसरात ध्यानधारणा करण्यासाठी एक जागा असावी, अशी सुचना पंतप्रधानांनी केली होती. त्याप्रमाणे या गुफेची निर्मिती करण्यात आली असून तिला रुद्र असे नाव देण्यात आल्याची माहिती गढवाल मंडळ विकास निगमच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली. या ठिकाणी ध्यानधारणेसाठी येणाऱ्या भाविकांकडून 3 हजार रूपये प्रति दिवस असा दर निश्चित करण्यात आला होता. परंतु अल्प प्रतिसाद पाहता तो कमी करून 990 रूपये प्रति दिवस आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी बुकींग सुरू केल्यापासून भाविकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. थंड हवामान आणि चढे दर पाहता अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती गढवाल मंडळ विकास निगमचे व्यवस्थापक बी.एल. राणा यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी किमान तीन दिवसांसाठी गुफेचे बुकींग करण्याची अट घालण्यात आली होती. परंतु आता ती अटदेखील काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येथे उभारण्यात आलेल्या गुफेप्रमाणेच आणखी 5 गुफांची निर्मिती करण्यात येणार आहे. गढवाल मंडळ विकास निगमद्वारे या गुफेचे बुकींग भाविकांना करता येऊ शकते. तसेच बुकींग करणाऱ्या भाविकांची वैद्यकीय चाचणीही करण्यात येते. या गुफेच्या निर्मितीसाठी साडेआठ लाख रूपयांचा खर्च आला आहे.