देशात पुन्हा एकदा करोनानं हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, वाढत्या धोक्यांबाबत लशीकरणबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत बोलताना पंतप्रधानांना करोनावरील लशीच्या वितरणासंदर्भात सूचना केल्या. त्याचबरोबर करोनावरील लस कधीपर्यंत येईल हे आपण ठरवू शकत नाही, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

देशातील सर्वाधिक करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,”करोनाविरोधातील लढाई सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांकडे काही सूचना असतील तरी त्यांनी केंद्र सरकारला लिखित स्वरूपात द्यावेत. देशभरात चाचण्या सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं कामही सुरू आहे. आपल्याकडे पुरेशा प्रमाण साधनं आहेत. त्यामुळे पूर्ण तयारी करावी लागेल. सुरूवातीच्या काळात लोकांमध्ये करोनाविषयी भीतीचं वातावरण होतं. मात्र, आता लोक करोनाला गांभीर्यानं घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर करोनाचा विषाणूची तीव्रता कमी झाल्याचं लोकांना वाटू लागलं आहे,” असं म्हणत पंतप्रधानांनी चिंताही व्यक्त केली.

COVID Vaccine: लशीच्या दुष्परिणामांसाठी तयार राहा; लशीकरणाआधीच केंद्राचे राज्यांना आदेश

करोना लशीच्या वितरणाची तयारी करण्याची सूचना करण्याबरोबरच लस कधीपर्यंत येईल याविषयी मोदींनी बैठकीत माहिती दिली. “लस कधीपर्यंत येईल, याचा कालावधी आपण निश्चित करू शकत नाही. उलट ही गोष्ट शास्त्रज्ञांच्याच हातात आहे. पण काही लोक या मुद्यावरून राजकारण करत आहेत. या मुद्याचं राजकारण करण्यापासून आपण कुणाला रोखू शकत नाही,” असंही मोदी म्हणाले.

ठरलं! आरोग्य क्षेत्रातील एक कोटी कर्मचाऱ्यांना करोना लशीचा पहिला डोस

राज्यातील भाजपा नेत्यांची मोदींकडे तक्रार

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात भाजपाकडून होत असलेल्या आंदोलनांचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणाले, “करोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल, तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्लीत , केरळ मध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही करोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून, दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत. त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व करोना लाटेला आमंत्रण मिळू शकते,” याकडे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.