पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वित्त मंत्रालय आणि अन्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. देशाच्या अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या या बैठकीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि रोजगाराच्या मुद्द्यावर चर्चा करम्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत वित्त मंत्रालयाच्या पाचही सचिवांव्यतिरिक्त नीति आयोगाचे अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत सर्व विभागांच्या सुधारित रुपरेषेवर विचार करण्यात आला. देशात व्यवसायासाठी अधिक सुलभता निर्माण व्हावी आणि अर्थव्यवस्था तेजीने पुढे जावी, यावर चर्चा करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महसूल वाढवण्यास तसेच जीडीपीचा वृद्धी दर वाढवण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 2018-19 या आर्थिक वर्षात जीडीपीचा वृद्धी दरात घट होऊन तो 6.8 टक्क्यांवर आला आहे. गेल्या पाच वर्षांमधील हा कमी वृद्धी दर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर चर्चा सुरू केली आहे. तसेच यातील यातील विचार आगामी अर्थसंकल्पातही सामिल करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीवर भर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील समस्या दूर करण्यासग शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.