देशवासीयांच्या सहभागाशिवाय स्वच्छता अभियान पूर्णत्वास जाऊच शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. ‘स्वच्छता अभियानात देशवासीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. अन्यथा हजार महात्मा गांधी आणि लाख नरेंद्र मोदी आले, तरी स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही,’ असे मोदींनी म्हटले.

स्वच्छ भारत अभियानाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘एक हजार महात्मा गांधी आले, एक लाख नरेंद्र मोदी आले, सर्व मुख्यमंत्री एकत्र आले, सर्व सरकारे एकत्र आली, तरीही स्वच्छ भारताचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकत नाही. मात्र सव्वाशे कोटी देशवासी एकत्र आल्यास बघता बघता हे स्वप्न पूर्ण होईल,’ असे मोदींनी म्हटले. यावेळी मोदींनी विरोधकांनाही टोला लगावला. ‘मोदींवर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. मात्र समाजाला जागृत करण्याच्या कामात राजकारण नको,’ असे ते म्हणाले. समाजात बदल घडवणाऱ्या मुद्यांची थट्टा केली जाऊ, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

‘विरोधकांकडून होणाऱ्या टीकेनंतरही सरकार स्वच्छ भारत अभियानात अग्रेसर राहिले. तीन वर्षांपासून आम्ही अविरतपणे हे अभियान राबवत आहोत. कारण बापूंनी दाखवलेला मार्ग चुकीचा असूच शकत नाही, असा विश्वास आम्हाला आहे. अनेक आव्हाने आहेत. मात्र केवळ आव्हाने आहेत, म्हणून देशाला त्याच स्थितीत ठेवता येणार नाही. ज्या ठिकाणी कौतुक होईल, अशीच कामे आपण हाती घ्यायची का?’, असा सवालदेखील मोदींनी उपस्थित केला.

‘स्वच्छता अभियान आता संपूर्ण देशाचे, देशातील सर्वसामान्यांचे अभियान झाले आहे. आता देशवासी एका सूरात त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. आसपासचा परिसर अस्वच्छ करण्यासाठी आपणही जबाबदार आहोत, याची सगळ्यांना कल्पना आहे. सर्वांना स्वच्छता आवडते. मात्र ती करणार कोण? हा प्रश्न आहे. आपण आता अनेक गोष्टी सरकारवर सोडून दिल्या आहेत. आधी सर्वकाही जनसामान्यांचे होते. तेव्हा कोणतीही समस्या उदभवत नव्हती. आताही जनसामान्यांनी पुढाकार घेतल्यास स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल,’ असेही त्यांनी म्हटले.