News Flash

“नंदीग्राममधून निवडणूक लढवणं ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक”, पंतप्रधानांची खोचक टीका!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये झालेल्या भाजपाच्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर खोचक टीका केली आहे. “ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूल काँग्रेसमधले लोकं सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वात मोठी चूक केली आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले. खुद्द ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची निवड केल्यामुळे या मतदारसंघात बिग फाईट पाहायला मिळत आहे.

नंदीग्रामचा कौल कुणाला मिळणार?

ममता बॅनर्जी या दरवेळी कोलकातामधील भोवानीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा मात्र त्यांनी हट्टाने नंदीग्राम मतदारसंघाची निवड केली. तृणमूलमधील त्यांचेच एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनाच भाजपाने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे. नंदीग्राममध्ये अधिकारी समाजाचं प्राबल्य असल्यामुळे सुवेंदू अधिकारी यांना त्याचा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, तरीदेखील ममता बॅनर्जींनी या मतदारसंघाची निवड केली.

ममता दीदी पंतप्रधानांवर भडकल्या, म्हणाल्या “आधी तुमच्या गृहमंत्र्यांना सांभाळा!”

 

ममता दीदी वाराणसीमध्ये जाणार?

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी यांच्या वाराणसीविषयीच्या विधानाचा देखील समाचार घेतला. ममता बॅनर्जी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जाण्याचं आव्हान दिलं आहे. त्यावर बोलताना मोदी म्हणाले, “वाराणसीमध्ये ममता बॅनर्जींना मोठ्या मनाचे, टिळा लावलेले आणि शेंडी असलेले लोकं भेटतील. त्याची त्यांना अडचण होईल. इथे त्यांना जय श्रीराम घोषणेचा राग येतो, तिथे त्यांना हर हर महादेव देखील ऐकायला मिळेल”, असं मोदी म्हणाले आहेत.

 

‘टाका मार कंपनी’ला पळ काढावा लागेल!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी तृणमूल काँग्रेसची खिल्ली देखील उडवी. “ममता दीदी तुम्ही बंगालच्या नागरिकांवर विश्वास ठेवायला हवा. बंगालच्या लोकांनी त्यांचा कौल दिला आहे. त्यांचा निर्णय झालाय की तुम्हाला तुमची टाका मार कंपनी (टीएमसी) घेऊन इथून निघून जावं लागेल”, असं मोदी म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 7:13 pm

Web Title: pm narendra modi on mamata banerjee taka maar company comment pmw 88
Next Stories
1 करोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? वाचा काय म्हणतायत तज्ज्ञ!
2 छत्तीसगड – नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद ; दहा जखमी
3 पश्चिम बंगाल – अमित शाहांचा रोड शो झालेल्या ठिकाणी ४१ क्रूड बॉम्ब आढळल्याने खळबळ
Just Now!
X