मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती असून बचावकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असताना पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. चिंचोळी गल्ली असल्याने या ठिकाणी मदतकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे की, “मुंबईतील डोंगरी येथे झालेल्या दुर्घटनेचं दुख: आहे. दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होतील अशी अपेक्षा. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य करत असून, गरजूंना मदत केली जात आहे”.

ढिगाऱ्याखालच्या लोकांना वाचवणं ही प्राथमिकता-मुख्यमंत्री
मुंबईतल्या डोंगरी भागात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कौसर बाग इमारत ही शंभर वर्षे जुनी होती. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी विकासक नियुक्त केला होता. या ठिकाणी जी कुटुंबं अडकली आहेत त्यांना बाहेर काढणं ही प्राथमिकता आहे. विकासकाने काय केलं? काय केलं नाही? या सगळ्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सगळी योग्य माहिती घेऊन त्यानंतर मदतीसंदर्भातली घोषणा केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या ठिकाणी अरुंद गल्ल्या आहेत त्यामुळे बचाव कार्य आणि लोकांचा जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे त्यानंतर इतर सगळ्या गोष्टी होतील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच या दुर्घटनेबाबत त्यांनी दुःखही व्यक्त केले आहे.

डोंगरी दुर्घटना: महापौरांवर चिडले स्थानिक रहिवासी
अरुंद रस्ते असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. या ठिकाणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेला कोण जबाबदार आहे याचा जाब स्थानिकांनी त्यांना विचारला. मात्र ही वेळ दोषी कोण हे शोधण्याची नसून जे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना वाचवण्याची आहे असे महापौरांनी म्हटले आहे. एकदा मदत आणि बचावकार्य संपलं आणि लोकांना सुखरुप बाहेर काढलं की या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही आश्वासन त्यांनी दिलं.