विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत निशाणा साधला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीत विरोधकांकडून वारंवार संसेदचं कामकाज बंद पाडणं हा संसदेचा, घटनेचा, लोकशाहीचा आणि लोकांचा अपमान आहे असं म्हटलं आहे. पेगॅसस, करोना स्थिती, शेतकरी आंदोलन तसंच अन्य मुद्द्यांवरुन विरोधकांकडून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला जात असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. नरेंद्र मोदींनी संसदेच्या कामकाजावरुन विरोधकांवर टीका करण्याची ही एका आठवड्यातील दुसरी वेळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदींना काँग्रेसवर निशाणा साधत खासदारांना लोकं आणि मीडियासमोर त्यांना उघडं पाडत सत्य मांडण्यास सांगितलं होतं. एकीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विरोधकांना एकत्र आणत ब्रेकफास्ट बैठक घेतली असतानाच मोदींनी ही टीका केली आहे. यानंतर काँग्रेसकडून इतर पक्षांसोबत संसदेपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी वाढत्या इंधनदराविरोधात निषेध करण्यात आला.

राहुल गांधींनी आयोजित केलेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे संजय राऊत उपस्थित होते. याशिवाय विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान आम आदमी पक्षाने मात्र या बैठकीला दांडी मारली.

राहुल गांधी यांनीदेखील गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. यावेळी विरोधकांनी पत्रकार परिषद घेत पेगॅसस प्रकरणावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या फोनमध्ये शस्राची घुसखोरी केली असून भारताच्या लोकशाहीवर हल्ला केला आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on opposition parliament protests says insult to democracy people sgy
First published on: 03-08-2021 at 11:30 IST