बिहार निवडणुकीत भाजपाला चांगलंच यश मिळालं असून जागांमध्ये वाढ होणारा भाजपा एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. बुधवारी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात ‘बिहार धन्यवाद’ कार्यक्रमात मोदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नरेंद्र मोदींनी यावेळी भाजपाच्या सायलेंट व्होटरसंबंधी सध्या चर्चा सुरु असल्याचं सांगत हे सायलेंट व्होटर नेमके कोण आहेत याबद्दल खुलासा केला.
“मी कालपासून बातम्यांमध्ये सायलेंट व्होटरसंबंधी वाचत आहे. भाजपाला सायलेंट व्होटर मतदान करत आहेत असं सांगितलं जात आहे. वारंवार त्यांचा उल्लेख केला जात आहे. देशातील नारी शक्ती याच आमच्या सायलेंट व्होटर आहेत. ग्रामीण ते शहरापर्यंत महिला मतदार भाजपाचे सायलेंट व्होटर ठरले आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
“प्रामाणिकपणे विकासाची कामे करणाऱ्या राजकीय पक्षालाच आता जनता पाठिंबा देते, त्या पक्षाला मते देऊन वारंवार सत्तेची संधी देते, हे बिहारच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे,” असंही यावेळी ते म्हणाले. त्यामुळेच भाजप एकमेव देशव्यापी बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं.
आणखी वाचा- उमा भारती म्हणाल्या, “तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, बिहारचं नेतृत्व करू शकतात; परंतु…”
“२१ व्या शतकातील भारताच्या नागरिकांनी वारंवार स्पष्ट संदेश दिला आहे की, प्रामाणिकपणे विकास करणाऱ्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळेल. सर्व राजकीय पक्षांकडून हीच अपेक्षा आहे. देशासाठी काम करा. बिहारमधील निकाल हेच दाखवत आहेत. २४ तास देशाचा विचार करा, नवे करण्याचा प्रयत्न करा. लोक तुमच्या मेहनतीला प्रतिसाद देतील. देशाचा विकास हाच भाजपचा मुख्य आधार आहे. बँक खाते, गॅस कनेक्शन, रोजगार, सुविधा, रस्ते, रेल्वे, रेल्वे स्टेशन, विमानतळ, नदीवर आधुनिक पूल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे विकासाचे मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे ठरत नाहीत असा पक्षांचा गैरसमज होता. पण आता हेच मुख्य मुद्दे आहेत. देशाचा, राज्यांचा विकास हाच आगामी निवडणुका जिंकण्याचा आधार असेल,” असं मोदी म्हणाले.
आणखी वाचा- मतदार हा कोणाचा गुलाम नाही; आता बंगालमध्येही निवडणूक लढवण्यावर विचार : ओवेसी
“देशातील लोकशाही परंपरेवर भाजपचा विश्वास असून बिहार निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळवून दिले म्हणून नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत लोकशाहीचा उत्सव साजरा केला म्हणून मी नागरिकांचे आभार मानत आहे,ठ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेचं कौतुक केलं. “बिहारची निवडणूक शांततेने आणि यशस्वीरीत्या पार पाडली गेली. त्याबद्दल निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन, निमलष्करी दल या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. कधी काळी बिहारमध्ये निवडणूक म्हटली की, किती लोक मारले गेले, किती बुथ लुटले, किती ठिकाणी पुन्हा मतदान झाले याचीच चर्चा होत असे. आता मतदानाची टक्केवारी किती वाढली, महिलांचे मतदान किती वाढले याची चर्चा होते. करोनामुळे मतदान कमी होईल ही शंकादेखील लोकांनी दूर केली,” अशा शब्दांत निवडणूक प्रक्रियेचे मोदींनी कौतुक केले.
घराणेशाहीवर टीका
जे.पी. नड्डा यांच्या कुशल आणि प्रभावी रणनीतीमुळेच बिहारमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचे सांगत मोदींनी नड्डा यांचं कौतुक केलं. “घराणेशाही मानणारे पक्ष, घराण्याचे पक्ष यांचे जाळे पसरले असून असे पक्ष लोकशाहीसाठी घातक बनत आहेत. या पक्षांचा देशाला मोठा धोका आहे. राष्ट्रीय स्तरावरील पक्षही (काँग्रेस) कुटुंबाचा पक्ष बनून गेला,” असल्याची टीका मोदींनी केली.
“भाजपच्या निवडणुकीतील यशाचे रहस्य सुप्रशासनात आहे. करोनाच्या संकटात भारताने जशी लढाई लढली तशी कोणीही लढली नाही. करोनाविरोधातील लढय़ासाठी योग्य निर्णय घेतले गेले, त्याचे व्यवस्थापन केले गेले. गरिबांना अन्नधान्याची मदत केली गेली. एक एक जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले हीच करोनामधील भारताची यशाची कहाणी आहे. करोनाकाळात शेती कायदा, स्वामित्व योजना, शिक्षण धोरण, ब्रॉडबँड योजना आदी महत्त्वाची धोरणे राबवली गेली,” असं पंतप्रधानांनी नमूद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 1:52 pm