एखाद्या घटनेवरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. या मीम्सद्वारे उपरोधिकरित्या टोमणा मारला जातो, किंवा एखाद्याची गंमत केली जाते. राजकीय नेत्यांपासून, बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू, सिनेमे अशा असंख्य विषयांवर मीम्स व्हायरल होतात. या मीम्सविषयीच अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला.

जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर स्वत:विषयीचे मीम्स पाहता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न अक्षयने विचारला. यावेळी त्याने मोदींना काही मीम्ससुद्धा दाखवले. हे मीम्स पाहून मोदींनाही हसू अनावर झालं. व्हायरल मीम्सविषयी ते म्हणाले, ‘मी या मीम्सचा पुरेपूर आनंद घेतो. त्यात मी मोदींना कमी आणि कल्पकतेला जास्त पाहतो. मीम्स बनवणाऱ्यांची कल्पक बुद्धी उत्तम असते. उपरोधिकपणे ते आपला मुद्दा मांडतात.’

पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियामुळेच सामान्य माणसाचा कल समजण्यास मदत होते, असं ते म्हणाले.

या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पंतप्रधान मोदींना राग येतो का, विरोधी पक्षांसोबत त्यांचं नातं कसं असतं, ते घड्याळ उलटं का घालतात अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मनमोकळेपणाने या मुलाखतीत उत्तरं दिली आहेत.