केवळ व्यवस्थेत बदल करून भागणार नाही, तर महिलांनी स्वत:ला तांत्रिकदृष्टय़ा सक्षम करून अधिक प्रभावी लोकप्रतिनिधी बनावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. मात्र शनिवारी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी ज्या महिला आरक्षण विधेयकाचा जोरदार पुरस्कार केला त्याबद्दल त्यांनी मौन बाळगले. रविवारी राजधानीत पार पडलेल्या राष्ट्रीय महिला लोकप्रतिनिधी परिषदेत मोदींनी हे मत व्यक्त केले.
व्यवस्थेत सतत बदल होत राहतात, पण तेवढे पुरेसे नाही. महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी सतत नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. विविध विषयांचा सर्वागाने अभ्यास करून ते आकडेवारीसह मांडता आले पाहिजेत. एकदा तुम्ही कार्यरत असलेल्या विभागात तुमच्या कामाच्या पद्धतीतून तुमची प्रतिमा तयार झाली की ती बराच काळ कायम राहील. त्यातून लोक तुम्हाला स्वीकारत जातील, असे मोदी म्हणाले. केवळ महिलांच्या विकासावर समाधानी न राहता महिलांच्या पुढाकाराने विकास ही संकल्पना अवलंबली पाहिजे असेही ते म्हणाले.