कठोर कारवाईचे पंतप्रधानांचे आदेश

कानपूर : काश्मिरी बांधवांवर हल्ला करणाऱ्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानपूर येथे दिला. लखनऊ येथे काश्मिरी विक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत त्यांनी हा हल्ला करणारे ‘डोकं फिरलेले’ लोक होते. देशात एकता टिकणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले. ते कानपूर येथे एका सभेत बोलत होते. भारतीय सैन्याच्या शौर्यावर विरोधी पक्ष अविश्वास दाखवत आहे, जो निराश करणारा आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याचे सर्व देशवासी साक्षी असताना केवळ राजकीय हेतूने विरोधी पक्ष दाखवत असलेल्या अविश्वासाने आणि त्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला मदतच होईल, अशी भीतीही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

लखनऊतील हल्ल्याचा राहुल गांधींकडून निषेध

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतरच्या घटनाक्रमात अलिकडे काश्मिरी व्यक्तींविरोधात करण्यात आलेल्या हिंसाचाराचा काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांनी निषेध केला असून देश हा कानाकोपऱ्यातील सर्व नागरिकांचा असल्याचे म्हटले आहे.

लखनऊ येथे बुधवारी सुका मेवा विकणाऱ्या दोन काश्मिरी व्यक्तींवर भगव्या कपडय़ातील टोळक्याने हल्ला करून मारहाण केली होती, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

या घटनेची चित्रफीत त्यांनी ट्विट केली असून काश्मिरी व्यापाऱ्यांवर उत्तर प्रदेशात झालेला हल्ला निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. हल्लेखोरांना तोंड देणाऱ्या शूर व्यापाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. भारत हा तेथील नागरिकांचा आहे. काश्मिरी बंधू-भगिनींविरोधात करण्यात आलेल्या हिंसाचाराचा मी निषेध करतो, असे राहुल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लखनौ येथे काश्मीरच्या सुकामेवा विक्रेत्यांना मारहाण करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशात अनेक ठिकाणी काश्मिरी व्यक्ती व विद्यार्थी यांच्यावर हल्ले करण्यात आले होते.

जम्मू बॉम्बहल्ल्यातील मृतांची संख्या दोनवर

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील वर्दळीच्या बस स्थानकावर गुरुवारी करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर राज्यातील पोलिसांनी दुकानदारांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे.

या  बॉम्बहल्ल्यात एक युवक ठार झाला होता तर अन्य ३२ जण जखमी झाले होते. जखमींपैकी मोहम्मद रियाज याचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिस सुत्रांनी सांगितले.

जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दुकानदारांना सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याचे आवाहन केले आहे.