पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर अपयशातून शिकलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी आगामी परीक्षांच्या निमित्ताने आज विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संघाचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे याने वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यात जखमी असूनही केलेली खेळी आणि राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यात केलेल्या ३७६ धावांच्या भागीदारीचं उदाहरण देत सकारात्मक विचार आणि प्रेरणेची ही शक्ती असल्याचं सांगितलं.
नरेंद्र मोदी यांनी राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचंही उदाहरण दिलं. “आपला संघ पिछाडीवर होता. पण राहुल द्रविड आणि व्हीव्हीएल लक्ष्मण यांनी ज्या पद्धतीने सामन्याचं रुपडं पालटलं ते आपण विसरु शकत नाही. सकारात्मक विचार आणि प्रेरणेची ही शक्ती आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी देशभरातील दोन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पाच विषयांवरील निबंधांच्या माध्यमातून १०५० विद्यार्थ्यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली.
२००१ मध्ये कोलकातामध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने ३७६ धावांची ऐतिहासिक भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला होता. १४ मार्च २००१ या दिवशी हा रेकॉर्ड झाला होता. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताची स्थिती २५४ धावांवर चार गडी बाद होती. भारताच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाची विजयी घोददौड १६ सामन्यांनी थांबली.
आणखी वाचा – Pariksha Pe Charcha 2020 with PM Modi: त्या रात्री मोदींच्या मनात नेमकं काय सुरु होतं?
नरेंद्र मोदी यांनी पुढे बोलताना अनिल कुंबळेचं उदाहरण दिलं. २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरोधातील कसोटी सांमन्यात फलंदाजी करताना चेंडू जबड्यावर लागल्याने जखमी झाला होता. मात्र त्यानंतरही गोलंदाजी करण्यासाठी तो मैदानात उतरला आणि लाराची विकेट घेतली होती.
त्या क्षणाची आठवण विद्यार्थ्यांना करुन देत नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “अनिल कुंबळे त्या सामन्यात जखमी झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. तो खेळला नसता तरी त्याला कोणी काहीही बोललं नसतं. पण तो खेळला आणि सामना जिंकून दिला. तुम्ही तुमच्या समस्यांना कशा पद्दतीने सामोरं जात यावर सर्व काही अवलंबून असतं”.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 1:20 pm