प्रदूषण हे सध्या सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरत आहे. यात आपल्यासारखी सामान्य लोकं तर सोडाच पण आता देवही प्रदुषणामुळे चिंतेत सापडल्याचं पहायला मिळतंय. ही घटना अन्य कुठली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षेत्रातील म्हणजेच वाराणसीतील आहे. वाढत्या प्रदुषणामुळे भक्तांनी चक्क देवाच्या मूर्तीलाच मास्क घातल्याचं पहायला मिळालं. दिवाळीनंतर संपूर्ण उत्तर भारतातच प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे. काशीमध्येही अनेकजण सध्या यापासून वाचण्यासाठी मास्क घालून फिसताना दिसत आहेत.

वाराणसीतील काशी विद्यापीठानजीक असलेल्या भगवान शंकराच्या मंदिरातील काही मूर्तींना त्या मंदिराचे पुजारी आणि भक्तांनी मास्क घातले आहेत. ”वाराणसी ही श्रद्धेची नगरी आहे. आपण भाविक देवालाही मानवी रूपातच पाहत असतो. गरमीमध्ये देवांच्या मूर्तींना आपण चंदनाचं लेपन करतो. तर हिवाळ्यात त्यांना स्वेटरही घालतो. जेव्हा आपण त्यांना मानवी रूपात असल्याचं मानतो तर त्यांनाही प्रदुषणाचा त्रास होत असावा. म्हणूनच आम्ही त्यांना मास्क घातलं आहे, ” असं पुजारी हरिष मिश्रा यांनी सांगितलं.

दुर्गा माता, काली माता आणि साईबाबांच्या मूर्तींनाही पूजा केल्यानंतर मास्क घातल्याचं त्यांनी सांगितलं. जेव्हा भाविकांनी देवांच्या मूर्तींना मास्क घातल्याचं पाहिलं तेव्हा भाविकांनीही प्रदुषणापासून बचावासाठी मास्क घालण्यास सुरूवात केली. मोठ्या व्यक्तींव्यतिरिक्त लहान मुलांनीही याकडे पाहून मास्कचा वापर करण्यास सुरूवात केल्याचं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालं आहे. धुक्याचा सामना करण्यासाठी या ठिकाणी फायर फायटिंग टीम तैनात करण्यात आली होती. अग्निशमन दलाचे जवान झाडांवर पाण्याचा मारा करून त्यांवर जमलेली धुळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले.