ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा तसेच इतर कायदेशीर मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारच्या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कौतुक केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सुरु करण्यात आलेल्या या योजनेबद्दल ज्येष्ठ नागरिकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाच्या बातमीवर भाष्य करताना पंतप्रधानांनी हे सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खूप चांगला उपक्रम केला आहे, असे त्यांनी ट्विट केले.

रविवारी पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशा राबवण्यात येत असलेल्या योजनेची बातमी ट्विट करत योगी आदित्यनाथ यांनी चांगला उपक्रम सुरु केला आहे असे म्हटले आहे. “खूप चांगला उपक्रम” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ते ट्विट रिट्विट करत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या आपल्या सर्वांगीण मंत्रातून प्रेरणा घेऊन उत्तर प्रदेश सरकार राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी ‘प्रोजेक्ट एल्डरलाइन’ च्या माध्यमातून त्यांना मदत तसेच पाठबळ देण्याचे काम करीत आहे. तुमच्या प्रामाणिक कौतुकासाठी राज्यातील सर्व जनतेच्या वतीने मनापासून आभार”, असे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात घेतली होती पंतप्रधानांची भेट

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली होती. दीड तासापेक्षा जास्त वेळाची ही भेट संपल्यानंतर ते बाहेर आले आणि पत्रकारांशी संवाद न साधता ते भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले.

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात फेरबदल?

त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत या भेटीची माहिती दिली. “आज मला नवी दिल्ली येथे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि मार्गदर्शन घेण्याचा बहुमान मिळाला. आपल्या कामकाजातून वेळ काढत मार्गदर्शन केल्याबद्दल आदरणीय पंतप्रधानांचे मनापासून आभार,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

पंतप्रधान मोदी आणि योगींमध्ये मतभेद?; #ModiVsYogi मुळे चर्चांना उधाण

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकींची तयारी सुरु

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. तसेच, करोना महामारीला तोंड देण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश आल्याचेही बोलले जात आहे. यावरून देखील योगी सरकारच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण केल जात आहेत.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली व त्यांच्यात जळपास दीड तास चर्चा झाली. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीस आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी उरला आहे, त्यामुळे भाजपाने आता संपूर्ण लक्ष पक्ष बळकटी करणावर केंद्रीत केल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला उत्तर प्रदेशच्या जनतेची नाराजी ओढावून घेणे परवडणार नाही. त्यामुळे या राजकीय हालचालींना वेग आल्याचेही बोलले जात आहे.