शीला दीक्षित यांची निधनाची बातमी ऐकून मला प्रचंड दु:ख झाले आहे. शीला दीक्षित काँग्रेस पक्षाची मुलगी होती. त्यांच्याबरोबर मी भावनात्मक दृष्टया जोडलेलो होतो. या दु:खद प्रसंगात माझ्या संवेदना शीला दीक्षित यांचे कुटुंबिय आणि दिल्लीच्या जनतेसोबत आहेत. १५ वर्ष शीला दीक्षित यांनी निस्वार्थ भावनेने दिल्लीची सेवा केली अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. आयुष्यभर काँग्रेससोसबत राहिलेल्या शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:ख झाले. त्यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात काँग्रेसपक्ष सहभागी असून या कठिण काळात त्यांनी बळ मिळो असे काँग्रेसने त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

शीला दीक्षित मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने प्रचंड दु:ख झाले आहे. दिल्लीच्या विकासात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.