नवी दिल्ली : स्वच्छ आणि हरित पर्यावरण हे मुद्दे आपल्या सरकारच्या धोरणांच्या मुळाशी आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुटेरेस यांच्या हस्ते ‘चँपियन्स ऑफ दि अर्थ’ पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आंतरराष्ट्रीय सौरऊर्जेच्या कामासाठी आणि पर्यावरणविषयक कृती कार्यक्रमातील सहकार्याच्या नव्या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरणविषयक सर्वोच्च बहुमान असलेला हा पुरस्कार संयुक्तरीत्या देण्यात आला असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाने (यूएनईपी) एका निवेदनात सांगितले.

हवामान आणि आपत्ती या बाबी संस्कृतीशी संलग्न आहेत आणि जोपर्यंत हवामानाबद्दलची चिंता हा आपल्या संस्कृतीचा भाग बनत नाही, तोपर्यंत अशा आपत्ती किंवा अरिष्टे टाळणे कठीण होईल. कृषीविषयक आणि औद्योगिक धोरणांपासून ते घरे बांधणे आणि शौचालयांच्या निर्मितीपर्यंत, स्वच्छ पर्यावरणाची गरज ही बाब सरकारच्या धोरणांना चालना देत आली आहे, असे मोदी यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकपासून २०२२ सालापर्यंत मुक्तता करण्याची आम्ही प्रतिज्ञा केली आहे, असे त्यांनी नमूद केले.

निसर्गाचा आदर करणे हा नेहमीच भारतीय समाजाचा भाग राहिलेला आहे. भारतीयांनी नेहमीच निसर्गाला एखाद्या सजीवासारखे वागवले असल्याचाही मोदी यांनी उल्लेख केला. ज्यांचा हरित अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे, त्यांच्या बाजूने तंत्रज्ञान आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस या वेळी म्हणाले. ज्यांना हवामान बदलाच्या प्रश्नाची जाणीव आहे आणि ज्यांना याबाबत कृती करण्याचे फायदे माहीत आहेत, असा नेता मोदी यांच्या रूपात आम्हाला भेटला आहे. तेही समस्या जाणतात आणि ती सोडवण्यासाठी कामही करतात, असे उद्गार गुटेरेस यांनी काढले.