18 October 2019

News Flash

पुलवामा हल्ल्याची माहिती उशिरा मिळाल्याने चिडले होते नरेंद्र मोदी, रॅली रद्द करत गाठली दिल्ली

पुलवामा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा नरेंद्र मोदी प्रमोशनल फिल्म शूट करण्यात व्यस्त होते असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे

पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये एक प्रमोशनल फिल्म शूट करण्यात व्यस्त होते असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आरोप फेटाळून लावत खराब वातावरण आणि नेटवर्क नसल्याने नरेंद्र मोदींना २५ मिनिटं उशिरा बातमी कळल्याचा दावा केला आहे. माहिती मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी तात्काळ दिल्लीला परतण्याचा प्रयत्न केला, मात्र खराब वातारवण असल्याने पोहोचण्यास उशीर झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी सात वाजता देहरादहूनला पोहोचले होते. पण खराब वातावरण असल्या कारणाने चार तास अडकून पडले होते. सकाळी 11.15 वाजता नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी टायगर सफारी, टुरिझम झोनचं उद्घाटन केलं. यासाठी त्यांना तीन तास लागले. यानंतर त्यांनी मोटरबोट राइड केली.

सुत्रांकडून कळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी रुद्रपूर येथे एका रॅलीला संबोधित करणार होते. पण दहशतवादी हल्ल्याची बातमी कळू लागल्यानंतर त्यांनी ती रद्द केली. त्यांनी तात्काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडून माहिती मागवली. रामनगर गेस्ट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर मोदी सतत तिघांच्या संपर्कात होते.

हल्ल्याची माहिती उशिरा मिळाल्याने नरेंद्र मोदी चिडले होते असंही सुत्रांकडून कळालं आहे. हेलिकॉप्टरने उड्डाण करण्यासाठी योग्य वातावरण नसल्याने मोदींनी रामनगर ते बरेली रस्त्याने प्रवास केला आणि तेथून रात्री दिल्लीला पोहोचले.

गुरुवारी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. ३ वाजून १० मिनिटांनी दहशतवादी झाला असताना नरेंद्र मोदी ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत डिस्कव्हरी चॅनेलसोबत प्रमोशनल फिल्म शूट करण्यात व्यस्त होते असा आरोप त्यांनी केला होता. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मात्र आरोप फेटाळून लावत देशासोबत खंबीर उभं राहण्याची गरज असताना काँग्रेस आपले खरे रंग दाखवत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसला पुलवामा हल्ल्याची आधीच कल्पना होती का ? असा टोला त्यांनी लगावला होता.

First Published on February 22, 2019 12:19 pm

Web Title: pm narendra modi recieves pulwama terror attack news 25 minute late