12 December 2017

News Flash

काळ बदलतोय, कामाची पद्धतीही बदला; मोदींचा आयएएस अधिकाऱ्यांना सल्ला

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना संबोधित केले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 1:05 PM

Triple Talaq : मुस्लिम स्त्रियांनाही त्यांचे मत मांडण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समाजातील जाणत्या लोकांनी महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले.

बदलत्या काळानुसार आपल्याला आपल्या कार्यपद्धतीतदेखील बदल करायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटले. नवी दिल्लीतील नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशासनात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

‘सुरुवातीच्या काळात आरोग्य सेवा पुरवण्यासापासून ते अगदी उद्योग उभारणीपर्यंत लोक सरकारवर अवलंबून होते. या सर्वच गोष्टींमध्ये सरकारी विभागांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. मात्र गेल्या १५ वर्षांमध्ये स्थितीत मोठा बदल झाला आहे. आता लोकांकडे पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास लोक खासगी विमान सेवेचा किंवा खासगी आरोग्य सेवांचा वापर करत आहेत,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. ‘गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. स्पर्धा वाढल्यामुळे सेवेचा दर्जा सुधारला आहे,’ असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘ई-गव्हर्नन्स, एम-गव्हर्नन्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे अधिकाधिक सोपे आहे. यामुळे सोयी-सुविधांचे लाभ लोकांपर्यंत सुलभतेने पोहोचवता येतात,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

‘लोकांच्या आयुष्यात, त्यांच्या दैनंदिन जीवनात बदल घडायला हवा. राजकीय नेतृत्त्वात बदल झाल्यावर धोरणांमध्ये बदल होतात. मात्र हे बदल लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचे असते. यासोबतच सरकारच्या धोरणांमध्ये जनसामान्यांचा सहभागदेखील महत्त्वपूर्ण असतो. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा देशहिताचाच असायला हवा,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले.

 

First Published on April 21, 2017 1:05 pm

Web Title: pm narendra modi says with changing times we may have to change our working style