विश्वभारतीचा पदवीदान सोहळा

शांतिनिकेतन : भारत व बांगलादेश यांच्यात सहकार्य व समझोत्याचे बंध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वभारती विद्यापीठाच्या ४९ व्या पदवीदान समारंभात सांगितले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख  हसीना वाजेद व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  तसेच विद्यापीठाचे कुलगुरू सबुजकोली सेन या वेळी उपस्थित होते.

मोदी म्हणाले की,  भारत व बांगलादेश हे वेगवेगळे देश असले तरी ते सहकार्य व समझोत्याच्या धाग्याने जोडले गेले आहेत. मग ती संस्कृ ती असो, की सार्वजनिक धोरण,  दोन्ही देशातील लोक एकमेकांपासून शिकत आहेत. बांगलादेश भवन हे  त्याचे उदाहरण आहे.

पंतप्रधान हे या विद्यापीठाचे आचार्य म्हणजे कुलपती आहेत, त्यांनी बांगलादेश भवनचे उद्घाटन केले. त्या वेळी शेख हसीन वाजेद उपस्थित होत्या. बांगलादेश भवन हे भारत व बांगलादेश यांच्यातील सांस्कृतिक सहकार्याचे प्रतीक आहे. हे भवन विद्यापीठाच्या आवारात बांगलादेशने उभारले आहे. विश्वभारतीच्या कामगिरीचे कौतुक करताना मोदी यांनी सांगितले, की टागोरांच्या भूमीत पाऊल ठेवताना आपल्याला रोमांचित झाल्यासारखे वाटते. मंचावर येत असतानाच रवींद्रनाथांच्या स्मृती जाग्या झाल्या, याच भूमीत त्यांनी कुठेतरी त्यांची शब्दसाधना केली असेल, गीते रचली असतील, महात्मा गांधींशी हितगुज केले असेल.

विद्यापीठाने राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन करताना मोदी म्हणाले, की  तुम्ही २०२१ पर्यंत ५० खेडय़ांचा विकास करीत आहात अशी माहिती मला मिळाली आहे, पण २०२१ पर्यंत म्हणजे विश्वभारती शतक गाठेल तोपर्यंत आणखी पन्नास शहरांच्या विकासात सहभागी व्हा असा माझा आग्रह आहे. रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू  सत्येंद्रनाथ टागोर हे नागरी सेवेतील पहिले भारतीय अधिकारी होते. त्यांची नेमणूक अहमदाबाद येथे होती. गुरूदेव टागोरांनी त्यांच्या बंधूंकडून सहा महिने काही बाबी शिकून घेतल्या व नंतर परदेशात गेले. रवींद्रनाथ काही काळ अहमदाबादेत होते, त्या वेळी त्यांनी एक कादंबरी व काही कविता लिहिल्या होत्या.

नवभारतात भूमिका पार पाडा

२०२२ पर्यंत नवभारत घडवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता विश्वभारतीसारख्या संस्थांनी भूमिका पार पाडावी. येथील पदवीधरांनी विकासाला नवी दिशा द्यावी. शिक्षण हे केवळ पुस्तकी नसावे. मुलांनी जगातील वैविध्यपूर्ण संस्कृती बघाव्यात, त्यातून त्यांचा सर्वागीण विकास होऊ शकतो. जर तुमच्यासोबत चालणारे कुणी नसेल तर तुम्ही एकटेच लक्ष्य गाठेपर्यंत चालत राहा. तुम्ही विकासाकडे एक पाऊल पुढे टाकलेत तर सरकार चार पावले पुढे टाकेल असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.