पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांवर टीकास्त्र

वृत्तसंस्था, केवडिया (गुजरात)

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांचा बळी घेणारा पुलवामा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने केल्याचे त्यांच्या संसदेने मान्य केल्यामुळे त्यावरून स्वार्थी राजकारण करणाऱ्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.

जेव्हा संपूर्ण देश पुलवामा दहशतवादी हल्लय़ात आमचे शूर सैनिक हुतात्मा झाल्यामुळे शोकाकुल होता, तेव्हा काही लोकांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी त्याचे राजकारण केले. परंतु आता पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी यांनीच पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीत पुलवामा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचा गौप्यस्फोट केल्याने या हल्ल्यावरून गलिच्छ, स्वार्थी राजकारण करणारे उघडे पडले आहेत, अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. देश पुलवामा हल्ला कधीही विसरू शकत नाही, पण काही लोकांनी त्यावर गलिच्छ राजकारण केल्याची टीका करून पंतप्रधान म्हणाले, की विरोधकांच्या राजकारणात स्वार्थीपणा आणि उन्मत्तपणा होता. देश शोकाकुल असताना काही राजकीय पक्षांचे लोक राजकारणात दंग होते. पण आता त्यांचा खरा चेहराच समोर आला आहे.

मोदी म्हणाले, ‘‘पुलवामा हल्ल्यानंतर आपल्यावर अर्वाच्य आणि असभ्य भाषेत आरोप करण्यात आले, परंतु आपण शांत राहिलो. पण आता विरोधकांचा खरा चेहरा उघडा पडला आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व देश, सर्वधर्मीय लोक यांनी दहशतवादाला विरोध केला पाहिजे. कारण दहशतवाद आणि हिंसाचार कुणाच्या हिताचा नाही. दहशतवादाच्या वेदना भारताने गेली अनेक वर्षे सोसल्या आहेत. त्यात शेकडो जवान आणि नागरिक बळी पडले आहेत. दहशतवादाविरोधात सर्वानी एकत्र आले पाहिजे.’’

करोना संकट काळात मृत्यू झालेल्या पोलिसांचे पंतप्रधान मोदी यांनी स्मरण केले. इतर देश करोना विरोधातील लढाईत चाचपडत असताना भारतातील १३० कोटी लोकांनी करोनाविरोधात खंबीरपणे लढा दिला. त्यातून भारत करोनाच्या कचाटय़ातून बाहेर पडून प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, असे मोदी म्हणाले.

नामोल्लेख टाळून चीनला इशारा

देशाच्या सीमा सुरक्षेविषयी चीनचे नाव टाळून मोदी म्हणाले की आपले सैनिक आता शत्रूला ठोस उत्तर देण्यास सज्ज आहेत. कुणी आमचा प्रदेश बळकावण्यासाठी वाकडी नजर केली, तर त्याला ‘जशास तसे’ उत्तर मिळेल हे आमच्या जवानांनी सिद्ध केले आहे. केंद्र सरकार सीमेवर रस्ते आणि बोगदे बांधत आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि सन्मान यासाठी आम्ही सज्ज आहोत.

पंतप्रधान म्हणाले,

– जम्मू-काश्मीरचे भारतात एकात्मीकरण करण्यासाठी आम्ही अनुच्छेद ३७० रद्द केला. सरदार पटेल यांना मुभा दिली असती तर त्यांनी तो प्रश्न तेव्हाच सोडवला असता, पण सरदार पटेल यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे.

– आता जम्मू-काश्मीर विकासाकडे वाटचाल करीत आहे. त्याचबरोबर देशाच्या ईशान्येत शांतता आणि समृद्धी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

– पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या फेरउभारणीचा आदेश देऊन देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा नवा यज्ञ सुरू केला. तो आम्ही अयोध्येत पुढे नेला. आता तेथे राममंदिर उभे राहत आहे.

पुलवामा हल्लय़ावरून राजकारण करताना काहींनी राजकीय फायद्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. अशा प्रकारचे राजकारण करू नये, कारण त्याचा सुरक्षा दलांच्या मनोधैर्यावर दुष्परिणाम होतो. देशविरोधी शक्तींच्या हातातील खेळणे बनण्यापासून राजकीय पक्षांनी दूर राहावे. 

नरेंद्र मोदी, पंतप्रधान