गुजरातमध्ये उभ्या राहणाऱ्या सरदार पटेल यांच्या पुतळयासंबंधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याला शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. काँग्रेसला फक्त खोट बोलण्यात आणि खोटयाचा प्रसार करण्यात रस आहे असा आरोप मोदींनी केला. सरदार पटेलांच्या पुतळयाची तुम्ही चीनमध्ये बनवल्या जाणाऱ्या बुटांशी तुलना करणार का ? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधींना विचारला.

बिलासपूर, बस्ती, चित्तोरगड, धनबाद आणि मंदसौर या पाच लोकसभा मतदारसंघातील भाजपा बूथ कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. काँग्रेसने नेहमीच सरदार पटेलांचा तिरस्कार, अपमान केला. पण आता संपूर्ण देश सरदार पटेलांची आठवण काढतोय तर काँग्रेसला ते सत्य पचवणे कठिण जातेय असे मोदी म्हणाले.

आपल्या सरकारच्या कार्यकाळात मागच्या चार वर्षात नक्षल प्रभावित भागांमधील हिंसाचार २० टक्क्याने कमी झाला असा दावा मोदींनी केला. २०१४ ते २०१७ या तीन वर्षात ३५०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सरकारची धोरणे आणि विकासामुळे हे शक्य झाले असे मोदी यांनी सांगितले.